2023 World Cup : बांगलादेशनंतर श्रीलंकेचा विश्वचषकातील गाशा गुंडाळला, पाच पराभवामुळे नामुष्की
2023 World Cup : बांगालदेशनंतर श्रीलंका संघाचेही विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले.
Sri Lanka in 2023 World Cup : बांगालदेशनंतर श्रीलंका संघाचेही विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. वानखेडेच्या मैदानावर भारताने श्रीलंकेचा दारुण पराभव केला. सात सामन्यात श्रीलंकेचा हा पाचवा पराभव होता. महत्वाच्या खेळाडूंना दुखापत अन् संघात असणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीत सातत्य नसल्यामुळे लंकेला विश्वचषकातील गाशा गुंडाळावा लागला.
श्रीलंकेची विश्वचषकातील कामगिरी -
यंदाच्या विश्वचषकात श्रीलंकेला लौकिकास साजेशी कामगीरी करता आली नाही. श्रीलंकेला सात सामन्यात पाच पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंकेला फक्त दोन सामन्यात विजय मिळवता आलाय. महत्वाच्या खेळाडूंना झालेल्या दुखापतीचा श्रीलंकेला फटका बसला. श्रीलंकेला नेदरलँड्स आणि इंग्लंडविरोधात फक्त विजय मिळवता आला. पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
कुणाच्या सर्वाधिक धावा -
श्रीलंकेकडून सदीरा समरविक्रमा याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने सात डावात 331 धावा केल्या. तर पथुम निसंका याने सात सानम्यात 289 धावा केल्या. कुसल मेंडिस याने सात सामन्यात 269 धावा केल्या.
गोलंदाजांची कामगिरी कशी राहिली ?
दिलशान मधुशंका याने विश्वचषक स्पर्धेत भेदक मारा केला. मधुशंका विश्वचषकात आतापर्यंतचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. मधुशंका याने सात सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत. तर कसुन रजिता याला आठ विकेट्स घेता आल्यात. इतर गोलंदाजांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही.
विश्वचषकातील श्रीलंकेचा प्रवास -
दोन्ही वॉर्मअप सामन्यात लंकेला पराभवाचा धक्का बसला होता. बांगलादेशने सात विकेट्सने तर अफगाणिस्तानने सहा विकेट्सने त्यांचा पराभव केला होता. विश्वचषकातही लंकेला चांगली कामगिरी करता आली नाही.
7 ऑक्टोबर -
बलाढ्य आफ्रिकेने पहिल्याच सामन्यात श्रीलंकेची पिसे काढली. दिल्लीमध्ये आफ्रिकेने प्ऱथम फलंदाजी करताना 428 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल लंकेचा संघ 236 धावांपर्यंत मजल मारु शकला. आफ्रिकेने हा सामना 102 धावांनी जिंकला.
10 ऑक्टोबर -
हैदराबाद येथे श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट्सच्या मोबदल्यात 345 धावांचा डोंगर उभरला. पण गोलंदाजांनी माती खाल्ल्यामुळे श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला. मोहम्मद रिझवानच्या झंझावती खेळीच्या बळावर पाकिस्तानने हे आव्हान सहज पार केले. पाकिस्तानने या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला.
16 ऑक्टोबर -
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्ताननंतर ऑस्ट्रेलियानेही श्रीलंकेचा पराभव केला. लखनच्या मैदानात लंकेने प्रथम फलंदाजी करताना फक्त 209 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल ऑस्ट्रेलियाने हे आव्हान पाच विकेट्स राखून सहज पार केले.
21 ऑक्टोबर -
सलग चार पराभवानंतर लंकेला पहिला विजय मिळाला. लखनौच्या मैदानात श्रीलंकेने दुबळ्या नेदरलँड्सचा पाच विकेट्सने पराभव केला. नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करताना 262 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल लंकेने हे आव्हान पाच विकेट्स राखून पार केले.
26 ऑक्टोबर -
नेदरलँड्सचा पराभव केल्यानंतर आत्मविश्वास उंचवलेल्या लंकेने गतविजेत्या इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला. बेंगळुरुच्या मैदानात इंग्लंडचा डाव फक्त 156 धावांत संपुष्टात आला. श्रीलंकेने हे आव्हान दोन विकेट्स गमावत सहज पार केले.
30 ऑक्टोबर -
दोन विजयाचा आत्मविश्वास घेऊन श्रीलंकेचा संघ पुण्यात आला. पण त्यांना इथे पराभवाचा सामना करावा लागला. अफागाणिस्तान संघाने सात विकेट्सने लंकेचा पराभव केला. श्रीलंकेने 241 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल अफगाणिस्तान संघाने तीन विकेट्सच्या मोबदल्यात हे आव्हान पार केले.
2 नोव्हेंबर -
भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर 357 धावांचा डोंगर उभारला. विराट कोहली, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी शतके ठोकली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. लंकेचा संपूर्ण संघ 55 धावात संपुष्टात आला. भारताने 302 धावांनी लंकेला पराभूत केले.
पुढील सामने कोणते ?
पाच पराभवासह श्रीलंकेचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलेय. त्यांना आणखी दोन सामने खेळायचे आहेत. त्यामध्ये बांगलादेश आणि न्यूझीलंड या संघाचा समावेश आहे. बांगलादेश संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलेय. तर न्यूझीलंड सेमीफायनलसाठी मैदानात आहे. 6 नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ शेवट गोड करण्यासाठी मैदानात उतरली. 9 नोव्हेंबर रोजी श्रीलंका आणि न्यूझीलंड बेंगळुरुच्या मैदानात भिडणार आहेत. श्रीलंका संघाने न्यूझीलंडचा पराभव केला, तर त्यांचेही आव्हान संपुष्टात येऊ शकते. श्रीलंका संघ न्यूझीलंडची पार्टी खराब करु शकतो.