IND vs SA : कर्णधार बवूमाने आणि रुसी व्हॅन डर डुसेन यांनी केलेल्या 204 धावांच्या भागिदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने निर्धारित 50 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 296 धावा केल्या आहेत. कर्णधार बवूमा याने 143 चेंडूत 110 धावांची खेळी केली. तर रुसी व्हॅन डर डुसेन याने 129 धावांची तडकाफडकी खेळी केली. भारतीय संघाला विजयासाठी 297 धावांचे आव्हान देण्यात आले आहे. भारताकडून बुमराहने दोन आणि अश्विनने एक विकेट घेतली. इतर गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश आले.


भारतविरोधात पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. 68 धावांत 3  विकेट घेत भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर कर्णधर बवुमा आणि डुसेन यांनी अप्रतिम शतकं झळकावत संघाचा डाव सावरला. ज्यामुळे आफ्रिकेने 50 षटकांत 296 धावा केल्या. राहुलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला विजयासाठी 297 धावांची गरज आहे.


पार्लच्या मैदानावर भारताची कामगिरी -  
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना पार्ल क्रिकेट ग्राऊंडवर होत आहे. या मैदानावर भारताने पहिला सामना 1997 मध्ये खेळला होता. हा सामना बरोबरीत सुटला होता. 2001 मध्ये भारताने केनियाला हरवले होतं. तर  2003 मध्ये नेदरलँडचा पराभव केला होता. या मैदानावर भारताने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यात भारतीय संघ अजेय आहे. आपला हा विक्रम भारतीय संघ कायम राखतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  


दोन्ही संघ कसे आहेत?
भारतीय संघ -
केएल राहुल (कप्तान), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर


दक्षिण आफ्रिका -
क्विंटन डिकॉक, जानेमन मलान, एडन मार्कराम, रुसी व्हॅन डर डुसेन , टेंबा बावुमा (कर्णधार), डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, मार्को जानसेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लुंगी एनगिडी


भारत तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा केलाय. यापूर्वी, भारतानं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. दरम्यान, भारत- दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेच्या वेळापत्रकावर एकदा नजर टाकुयात. तसेच हे सामने कधी, कुठे खेळले जाणार आहेत? 


भारत- दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना- 19 जानेवारी (बोलंड पार्क, पार्ल) 
दुसरा एकदिवसीय सामना- 21 जानेवारी (बोलंड पार्क, पार्ल)
तिसरा एकदिवसीय सामना-  23 जानेवारी (न्यू लँड्स क्रिकेट ग्राऊंड, केपटाऊन)