Shubman Gill Century in Ranji Trophy : भारतीय क्रिकेट संघातील अनेक स्टार खेळाडू सध्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहेत.टीम इंडियाचा कसोटी कर्णधार रोहित शर्मासह इतर अनेक खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले, परंतु ते प्रभावी ठरले नाहीत. या सगळ्यामध्ये, फक्त एकाच खेळाडूने स्वतःला सिद्ध केले आणि तो म्हणजे शुभमन गिल. पंजाबकडून खेळणारा गिल पहिल्या डावात अपयशी ठरला पण दुसऱ्या डावात त्याने एकट्याने तुफानी खेळी खेळली आणि शानदार शतक झळकावले.
बंगळुरूमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यात पंजाब संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. पण कर्नाटकने त्यांचा पहिला डाव फक्त 55 धावांत गुंडाळला. त्यानंतर कर्नाटक संघाने पहिल्या डावात 475 धावांचा मोठा स्कोअर केला. ज्यामुळे त्यांना 420 धावांची आघाडी मिळाली आणि पंजाबचा संघ बॅकफूटवर गेला. दुसऱ्या डावात पंजाबच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा दबावाखाली आपल्या विकेट गमावल्या. अर्धा संघ 65 धावांवर तंबुत गेला होता. मुख्य फलंदाजांमध्ये फक्त शुभमन गिल उरला होता, जो ओपनिंगला आला होता. त्याने हार मानली नाही आणि शतक झळकावले. शुभमनने कठीण परिस्थितीतही शानदार खेळ करत हे शतक ठोकले.
पंजाबचा दारुण पराभव
पंजाबने 84 धावांत 6 विकेट गमावल्यानंतर गिलने मयंक मार्कंडेसोबत 63 धावांची भागीदारी केली. यासह प्रथम त्याने त्याच्या संघाचा धावसंख्या 150 च्या जवळ नेला. त्यानंतर त्याने सुखदीप बाजवासोबत 40 धावा जोडल्या. पण, तो 187 धावांवर बाद झाला, ज्यामध्ये त्याने 102 धावांचे योगदान दिले. गिलच्या खेळीमुळे पंजाब संघाने कसा तरी 200 धावांचा टप्पा ओलांडला. पण गिल आऊट होताच उर्वरित फलंदाजही लवकर बाद झाले. उर्वरित विकेटही पुढील 26 धावांतच पडल्या. संपूर्ण पंजाब संघ 213 धावांवर ऑलआउट झाला. अशाप्रकारे, त्यांना एक डाव आणि 207 धावांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी
शुभमन गिलचे फॉर्ममध्ये पुनरागमन ही भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गिलला चांगली कामगिरी करता आली नाही, पण आता शुभमन गिलनं रणजीत शानदार शतक ठोकलं आहे, ज्यामुळे गिल आता इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही हाच फॉर्म कायम ठेवू इच्छितो. त्याच वेळी, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलामीवीर म्हणून गिलवर मोठी जबाबदारी असेल.
हे ही वाचा -