Aryan Juyal Double Century : एकीकडे टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिका सुरू आहे, तर दुसरीकडे प्रतिष्ठित देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा रणजी ट्रॉफी स्टार खेळाडूंमुळे चर्चेत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरलेले अनेक भारतीय खेळाडू 2024-25 च्या रणजी ट्रॉफीच्या सहाव्या फेरीत खेळत आहेत. यामध्ये रोहित शर्मा, ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, यांसारखे अनेक मोठे खेळाडू आहेत जे फेल ठरले. पण या मोठ्या चेहऱ्यांमध्ये, लखनऊ सुपर जायंट्सच्या 23 वर्षाच्या पठ्ठ्याने द्विशतक झळकावून खळबळ उडवून दिली आहे. 


23 वर्षाच्या पठ्ठ्याने द्विशतक ठोकले द्विशतक


रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यात सामना खेळला जात आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेशचा कर्णधार आर्यन जुयालने शानदार द्विशतक झळकावून बिहारच्या गोलंदाजांचे कंबरडे मोडले. त्याने 256 चेंडूंचा सामना केला आणि 18 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 200 धावा केल्या. आयपीएल 2025 पूर्वी जुयालच्या बॅटमधून झळकलेले हे द्विशतक लखनऊ सुपर जायंट्स कॅम्पसाठी आनंदाची बातमी आहे. आर्यन जुयाल आयपीएल 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे. यापूर्वी तो 5 वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सचा भाग होता.






जुयालच्या द्विशतकामुळे यूपी संघाने आपला पहिला डाव 603/2 धावांवर घोषित केला. जुयाल व्यतिरिक्त अभिषेक गोस्वामीने 198 आणि करण शर्माने 118 धावा केल्या. तर, माधव शर्माने 63 धावांचे योगदान दिले. या सामन्यात बिहारचा पहिला डाव 248 धावांपर्यंत मर्यादित राहिला. यानंतर, यूपीने 602 धावा केल्या आणि 354 धावांची आघाडी घेतली.


2018 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रवेश करणाऱ्या तरुण जुयालने 2019 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी उत्तर प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 25 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 40 पेक्षा जास्त सरासरीने 1661 धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून 6 शतके आणि 6 अर्धशतके झाली आहेत. या 6 शतकांमध्ये 2 द्विशतकांचा समावेश आहे. 2018 मध्ये 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघात आर्यन जुयाल देखील होता. यानंतर, देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये स्थान मिळवले आणि आता तो लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग आहे.


हे ही वाचा -


Ajinkya Rahane : मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO