Shreyas Iyer Hundreds for Mumbai in Ranji Trophy : काही काळापासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेल्या श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफीमध्ये सलग दुसरे शतक झळकावले आहे. सलग दुसऱ्या शतकाच्या जोरावर या स्टार फलंदाजाने टीम इंडियाच्या निवडकर्त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रणजी ट्रॉफी 2024/25 मध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने बुधवारी या मोसमातील चौथ्या फेरीच्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी शानदार शतक झळकावले.


रणजी ट्रॉफीतील गतविजेत्या मुंबईच्या शेवटच्या सामन्यात अय्यर खेळला नव्हता. पण या सामन्यात पुनरागमन केल्यानंतर ओडिशाविरुद्ध पहिल्याच दिवशी जबरदस्त शतक ठोकले. त्याने ओडिशाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील 15 वे शतक पूर्ण केले.




मुंबईतील शरद पवार क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज अय्यरने शानदार फलंदाजी केली. ओडिशाविरुद्धच्या या सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणे गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर तो फलंदाजीला आला. अय्यरने मैदानात येताच फटकेबाजी सुरू केली आणि प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सलग दुसरे शतक ठोकले. या स्टार फलंदाजाने यापूर्वी 18 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यातही शतक झळकावले होते. त्या सामन्यात त्याने 142 धावांची अप्रतिम खेळी केली.




29 वर्षीय श्रेयस अय्यरने या वर्षी फेब्रुवारी 2024 मध्ये विशाखापट्टणम येथे शेवटचा कसोटी सामना खेळला होता. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तो फ्लॉप ठरला होता, तेव्हापासून भारतीय कसोटी संघापासून तो बाहेर आहे. अय्यर या मालिकेत चांगली कामगिरी करू शकला नाही आणि त्यानंतर त्याची बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध निवड झाली नाही. त्यानंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठीही त्याला टीम इंडियात स्थान मिळाले नाही. 




पण हा रणजी हंगाम अय्यरसाठी खूप महत्त्वाचा असेल. कारण त्याला पुन्हा एकदा टीम इंडियात पुनरागमन करायचे आहे. या  सलग दुसरे शतक झळकावून त्याने टीम इंडियात पुनरागमन करण्याचा दावा केला आहे. आतापर्यंत त्याने भारतीय संघासाठी 14 कसोटी सामन्यांच्या 24 डावांमध्ये 36.86 च्या सरासरीने 811 धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या नावावर 1 शतक आणि 5 अर्धशतकं आहेत.




हे ही वाचा -


IPL 2025 Mega Auction Prithvi Shaw : 7.5 कोटीवरून थेट लाखांवर.... पृथ्वी शॉला भरली धडकी; मेगा लिलावापूर्वी घेतला मोठा निर्णय


ICC Test Rankings : ICC कसोटी क्रमवारीत दे धक्का! रोहित शर्मा- विराट कोहली यांना दणका, ऋषभ पंतने वाचवली लाज