Virat Kohli And Rohit Sharma: कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्मा अन् विराट कोहलीची जागा कोण घेणार?; आयपीएलमधील दोन खेळाडूंची चर्चा
Who Will Replace Virat Kohli And Rohit Sharma in England Test Series: रोहित शर्मा आणि विराट कोहलीची कसोटी क्रिकेटच्या संघात कोण जागा घेणार, याबाबत चर्चा रंगली आहे.

Who Will Replace Virat Kohli And Rohit Sharma in England Test Series: टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता विराट कोहलीनेही (Virat Kohli) कसोटीतून निवृत्ती घेण्याबाबत बीसीसीआयकडे इच्छा व्यक्त केली आहे. मात्र बीसीसीआयने विराट कोहलीला निवृत्तीवर फेरविचार करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आगामी इंग्लंडचा दौरा महत्वाचा आहे. त्यामुळे कसोटीतून निवृत्ती घेण्याबाबत पुन्हा विचार करावा, असं बीसीसीआयने विराट कोहलीला सांगितले आहे. मात्र विराट कोहली कोणता निर्णय घेणार, हे आगामी काही दिवसांतच कळणार आहे. मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहलीची कसोटी क्रिकेटच्या संघात कोण जागा घेणार, याबाबत चर्चा रंगली आहे.
भारताला पुढील महिन्यात इंग्लंडचा दौरा करायचा आहे. टीम इंडियाला इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना २० जूनपासून खेळला जाईल. रोहित शर्माने आधीच निवृत्ती घेतली आहे. आता जर विराटनेही कसोटीतून निवृत्ती जाहीर केली तर आयपीएल 2025 च्या हंगामात चांगली कामगिरी करणारे दोन खेळाडू त्यांची जागा घेऊ शकतात.
रोहित शर्माच्या जागी साई सुदर्शन-
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत युवा फलंदाज साई सुदर्शन माजी कर्णधार रोहित शर्माची जागा घेऊ शकतो. साई सुदर्शन उत्तम फॉर्ममध्ये आहे. सुदर्शनने आयपीएल 2025 च्या 11 सामन्यांमध्ये 509 धावा केल्या आहेत. साई सुदर्शनने भारतासाठी 3 एकदिवसीय आणि एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. सुदर्शनने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन अर्धशतके झळकावली आहेत.
अनुभवी खेळाडू विराटची जागा घेऊ शकतो-
भारताला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या जागी चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. श्रेयस अय्यरही उत्तम फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2025 मध्ये श्रेयस अय्यरने आतापर्यंत 405 केल्या आहेत. श्रेयस अय्यरने भारतासाठी 70 एकदिवसीय, 51 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि 14 कसोटी सामने खेळले आहेत. श्रेयस अय्यर एकदिवसीय सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर उत्तम कामगिरी करतो. आता त्याला कसोटी सामन्यांमध्येही या स्थानावर खेळवता येईल.
आयपीएलची स्पर्धा लवकरच होणार सुरु-
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान 9 मे रोजी बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. काल (10 मे) भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीची घोषणा झाली त्यानंतर आयपीएल आता पुन्हा सुरु होणार आहे. आयपीएल पुन्हा सुरु करण्यावर आज निर्णय अपेक्षित आहे. बीसीसीआयची आज बैठक देखील आहे. बीसीसीआय केंद्र सरकारसह, फ्रँचायजी,ब्रॉडकास्टर्स,स्पॉन्सर्स आणि राज्य क्रिकेट संघांसोबत चर्चा करणार आहे. मात्र आयपीएलमध्ये विविध संघाकडून खेळणारे अनेक परदेशी खेळाडू आपापल्या देशात परतले आहेत. त्यामुळे आयपीएलच्या संघ मालकांनी त्यांना पुन्हा भारतात येण्यास सांगितले आहे.





















