बाबरच्या फलंदाजीवर शोएब अख्तर निराश, भारताविरोधातील सामन्याआधी खडसावले
Babar Azam : विश्वचषकात पाकिस्तानचा संघाने लागोपाठ दोन सामने जिंकले आहे. ने
Shoaib Akhtar On Babar Azam : विश्वचषकात पाकिस्तानचा संघाने लागोपाठ दोन सामने जिंकले आहे. नेदरलँड आणि श्रीलंकेचा पराभव करत पाकिस्तान संघाने दमदार सुरुवात केली आहे. पण बाबर आझम याला अद्याप मोठी कामगिरी करता आली नाही. बाबरला 30 धावासंख्याही ओलांडता आली नाही. त्यावरुन पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने बाबर आझम याला खडसावले आहे. दरम्यान, पाकिस्तान संघाने श्रीलंकेने दिलेले 345 धावांचे आव्हान यशस्वी पार केले. अब्दुल्लाह शफीक आणि मोहम्मद रिझवान यांच्या शतकी खेळीच्या बळावर पाकिस्तान संघाने विराट आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. पण या सामन्यात बाबर आझम स्वस्तात माघारी परतला. श्रीलंकाविरोधात बाबर आझम फक्त दहा धावा काढून बाद झाला. त्याआधी नेदरलँडविरोधात त्याला फक्त पाच धावा काढता आल्या होत्या. त्यामुळेच सध्या बाबर आझम याच्यावर टीका होत आहे. शोएब अख्तर यानेही निशाणा साधला आहे.
बाबर आजमच्या फॉर्मवर काय म्हणाला शोएब अख्तर ?
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने बाबर आझमच्या फॉर्मवर बोट ठेवले आहे. शोएब अख्तर म्हणाला की बाबर आझम पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. पण आम्हाला बाबर आझमसारखा दुसरा खेळाडू मिळाला आहे.शोएब अख्तर म्हणाला की, बाबर आझमप्रमाणेच आम्हाला अब्दुल्ला शफीक सापडला आहे. बाबर आझम हा महान खेळाडू आहे. पण मोठ्या सामन्यांमध्ये तुम्हाला धावा कराव्याच लागतात. आगामी सामन्यांमध्ये बाबर आझम नक्कीच पुनरागमन करेल, असेही तो म्हणाला.
पुढील सामन्यात बाबर नक्कीच चांगला खेळेल - शोएब अख्तर
बाबर आझम दोन सामन्यात फ्लॉप गेला, पण तो मोठा खेळाडू आहे. पुढील सामन्यात तो नक्कीच मोठी खेळी करेल. बाबर आझमकडून पाकिस्तानला मोठ्या अपेक्षा आहेत. त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. भारताविरोधात तो धावा काढेल, असे शोएब अख्तर म्हणाला.
गोलंदाजांचा केला बचाव -
शोएब अख्तरने पाकिस्तानी गोलंदाजांचा बचाव केला. तो म्हणाला की, मी पाकिस्तानी गोलंदाजांवर टीका करणार नाही, त्यांच्यासोबत आहे. ते लवकरच जोरदार कमबॅक करतील. सध्या आमचे गोलंदाज वनडे फॉरमॅटमध्ये गोलंदाजी करण्यास योग्य नाहीत. वनडे फॉरमॅटमध्ये 10 षटकांची गोलंदाजी हा वेगळा अनुभव असतो.
विश्वचषकाच्या पहिल्या दोन्ही सामन्यात बाबर आझम फ्लॉप -
विश्वचषकातील पहिल्या दोन्ही सामन्यात पाकिस्तान संघाने विजय मिळवला. श्रीलंका आणि नेदरलँड यांच्याविरोधात पाकिस्तान संघाने बाजी मारली. पण या दोन्ही सामन्यात बाबर आझमला मोठी खेळी करता आली नाही. दोन्ही सामन्यात बाबर आझमची बॅट शांतच राहिली. नेदरलँडच्या विरोधात बाबर आझम 5 धावा काढून तंबूत परतला होता. तर श्रीलंकाविरोधात 10 धावा काढून तंबूत परतला. आता भारताविरोधात होणाऱ्या सामन्यात बाबर कशी कामगिरी करतो? याकडे क्रीडा जगताचे लक्ष लागले आहे.