Cricketer Mashrafe Mortaza House Fire Bangladesh Protests: राखीव जागांच्या मुद्द्यावरुन बांगलादेशमधील हिंसक निदर्शनांची (Bangladesh Protests) धग इतकी वाढली की सोमवारी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना पदाचा राजीनामा देऊन तातडीने देश सोडावा लागला. यानंतर भारताकडे पलायन करण्याची वेळ शेख हसीना यांच्यावर आली. हसीना शेख यांनी ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितला आहे. मात्र लंडनमधून त्यांना नकार आल्याची माहिती आहे. 


बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाने उग्र रुप धारण केलं असून त्याची परिणती आता हिंसाचारामध्ये झाली आहे. या आंदोलनात आतापर्यंत 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच आंदोलकांनी बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार  मशरफी मुर्तझा याच्या घराची देखील तोडफोड केली. 


मशरफी मुर्तझाच्या घराची तोडफोड-


बांगलादेशचे माजी क्रिकेटपटू मशरफी मुर्तझा हे देखील शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगचे खासदार म्हणून निवडून आले होते. आंदोलकांनी मशरफी मुर्तझाच्या घरावर हल्ला केला. तसेच घराची तोडफोड आणि लूटमार करत आग लावल्याची माहिती देखील समोर आली आहे. मशरफी मुर्तझा हे बांगलादेशातील नराइल-2 मतदारसंघाचे खासदार आहेत, जे माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या जवळचे मानले जातात. 






मशरफी मुर्तझा सलग दुसऱ्यांदा खासदार-


मशरफी मुर्तझा या वर्षी सलग दुसऱ्यांदा नरेल-२ मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. मशरफी मुर्तझाच्या घराला आग लावण्याबरोबरच आंदोलकांनी जिल्ह्यात असलेल्या अवामी लीगच्या कार्यालयालाही आग लावली. याच जिल्ह्यात पक्षाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे. नारायणगंज-4 मतदारसंघात लूटमार आणि अवामी पक्षाशी संबंधित अनेक नेत्यांच्या घरांची तोडफोड झाल्याची बातमी आहे. दुसरीकडे, शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर त्यांच्या अधिकृत निवासस्थानाची लूट आणि तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य एवढे आहे की हसीनाचे वडील शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा पाडण्यात आला आहे.


कोण आहे मशरफी मुर्तझा-


मशरफी मुर्तझा बांगलादेशकडून 20 वर्षे क्रिकेट खेळला आणि बराच काळ कर्णधारही होता. आपल्या ऐतिहासिक कारकिर्दीत त्याने 36 कसोटी सामने खेळले, ज्यात त्याच्या नावावर 78 विकेट आणि 797 धावा आहेत. त्याच्या नावावर 220 एकदिवसीय सामन्यांमध्ये 270 विकेट आहेत आणि एक फलंदाज म्हणून त्याने 1787 धावा केल्या आहेत. त्याच्या 54 सामन्यांच्या टी-20 कारकिर्दीत त्याने 42 विकेट आणि 377 धावा केल्या.


संबंधित बातमी:


बांगलादेश का पेटला? ज्यांच्या एका वाक्यावरून हिंसाचाराची ठिणगी पेटली त्या शेख हसिना कोण?