मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनासमोर अखेर नमतं घेत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी देशातून पळ काढत नवी दिल्ली गाठली. नवी दिल्लीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी हसीना यांच्याशी चर्चा केली. तर दुसरीकडे, पंतप्रधान मोदींनी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक घेतली. हसीना यांच्याबद्दल नेमकं काय धोरण ठेवायचं याबाबत या बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, हसीना यांनी ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितल्याचं कळतंय, मात्र लंडनमधून त्यांना नकार आल्याची माहिती आहे. 


सध्या बांगलादेशवर लष्कराचा ताब आहे, काही दिवसातं अंतरिम सरकार स्थापन केलं जाणार आहे. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस हे बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे.  आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेख हसीना यांनी 'रझाकार' म्हटलं आणि या आंदोलनाला हिंसाचाराचं स्वरूप प्राप्त झालं. 


बांगलादेश का पेटला?



  • बांगलादेशात सरकारी नोकरीतील आरक्षण कोट्यावरुन वाद पेटला.

  • 1971 मध्‍ये बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाले. 1972 मध्‍ये स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्‍के आरक्षण जाहीर करण्यात आलं. 

  • 2018 मध्ये शेख हसीना सरकारने हे आरक्षण रद्द केलं. मात्र उच्च न्यायालयाने आरक्षणाची पुन्हा अंमलबजावणी केली.

  • स्वातंत्र्य सैनिकांच्या आरक्षणाचा तिसऱ्या पिढीला लाभ का? असा सवाल विचारला जाऊ लागला. 

  • आरक्षण भेदभाव करणारं, नोकरी मेरिटच्या आधारावर मिळावी अशी मागणी होऊ लागली. 

  • जून 2024 मध्ये आरक्षण पुन्हा लागू करण्याचे कोर्टाचे आदेश. त्यामुळे बांगलादेशात पुन्हा तीव्र आंदोलन सुरू झालं. 

  • ढाका आणि इतर मोठ्या शहरांत गेले अनेक दिवस विद्यार्थी रस्त्यावर उतरले. 

  • आंदोलकांना शेख हसीना रझाकार म्हणाल्यानं तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. 

  • 'रझाकार' हा शब्द 1971 मध्ये पाक लष्कराला मदत करणाऱ्यांसाठी वापरला जातो. 

  • विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनात आतापर्यंत 300हून अधिक जणांचा मृत्यू झाला. 


शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून भारतात आश्रय घेतल्यानंतर बांगलादेशात आता लष्कराने अंतरिम सरकार स्थापन केलं आणि लगोलाग संपूर्ण बांगलादेशात लावलेल्या कर्फ्यू उठवला. त्याचसोबत, आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देत शांतता राखण्याचं आवाहन केलंय. मात्र तरीही, आंदोलक अजूनही शांत झालेले नाहीत. आंदोलकांनी थेट शेख हसीना यांच्या निवासस्थानी धडक देत तिथं तोडफोड आणि जाळपोळ केलीय. इतकंच काय तर हसीना यांच्या निवासस्थानी आंदोलकांनी चिकन आणि इतर पदार्थांवरही ताव मारला. 


ज्यांच्या एका वक्तव्यावरून बांगलादेश पेटलं त्या शेख हसीना नेमक्या कोण आहेत तेही पाहा, 


बांग्लादेश सोडलेल्या शेख हसीना कोण?



  • शेख हसीना यांचा जन्म 28 सप्टेंबर 1947 रोजी झाला. त्या बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबूर रेहमान यांच्या कन्या आहेत. 

  • विद्यार्थी असतानाच शेख हसीना यांचा राजकीय प्रवेश झाला. त्यांनी अवामी लीगच्या विद्यार्थी विंगचं काम सांभाळलं. 

  • 1975 साली लष्कराने हसीना यांच्या कुटुंबाविरोधात मोर्चा उघडला. त्यामध्ये हसीना यांचे आई-वडील, तीन भावांची लष्कराकडून हत्या करण्यात आली. 

  • आई-वडिलांच्या हत्येनंतर शेख हसीना काही काळ जर्मनीत राहिल्या. 

  • 1975 साली इंदिरा गांधींनी हसीना यांना भारतात आश्रय दिला. 

  • सहा वर्षे निर्वासित आयुष्य जगून हसीना पुन्हा बांगलादेशात परतल्या. 

  • बांगलादेशात वडिलांच्या अवामी लीगचं पक्षकार्य सांभाळलं. 

  • 1986 साली पहिल्यांदा निवडणूक लढल्या. 1996 साली हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या.


भारत सतर्क


बांगलादेशातील अभूतपूर्व अस्थिरतेनंतर भारतही सतर्क झाला असून, भारतातून बांगलादेशला जाणारी विमानसेवा आणि रेल्वेसेवा स्थगित करण्यात आलीय. त्याचसोबत बांगलादेशच्या सर्व सीमांवर बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय. 


बांगलादेशातील या घडामोडींचा भारतावर थेट परिणाम आहे. बांगलादेशात निर्माण झालेली ही अस्थिरता आणि हिंसक परिस्थिती आणखी किती दिवस राहते याकडे भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. 


ही बातमी वाचा: