Ranji Trophy : सौराष्ट्र अन् बंगालमध्ये होणार फायनल, उपांत्य फेरीत कर्नाटक, मध्य प्रदेशचं आव्हान संपुष्टात
Ranji Trophy Semi-Final : 16 फेब्रुवारीपासून कोलकाता येथील ईडन गार्डनच्या मैदानावर सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यात फायनलचा थरार रंगणार आहे.
Ranji Trophy Semi-Final : रणजी चषकाच्या फायनलसाठी सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यात लढत होणार आहे. 16 फेब्रुवारीपासून कोलकाता येथील ईडन गार्डनच्या मैदानावर सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यात फायनलचा थरार रंगणार आहे. उपांत्य सामन्यात सौराष्ट्राने कर्नाटकचा पराभव केला तर बंगालने गतविजेत्या मध्य प्रदेशला घरचा रस्ता दाखवला. रणजी चषकाच्या विजयासाठी सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यात सामना होणार आहे.
मयांकचं द्विशतक व्यर्थ, कर्नाटकचा पराभव, सौराष्ट्रची फायनलमध्ये धडक
अटीतटीच्या सामन्यात सौराष्ट्राने कर्नाटकचा चार गड्यांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. उपांत्य सामन्यात मयांकनं द्विशतकी खेळी केली मात्र, त्याची खेळी व्यर्थ गेली. कर्नाटकने पहिल्या डावात 407 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तर सौराष्ट्राने पहिल्या डावात 527 धावांचा डोंगर उभारत मोठी आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात कर्नाटक संघाला 234 धावांपर्यंत मजल मारता आली. सौराष्ट्राने हे लक्ष्य सहा गड्यांच्या मोबदल्यात पार करत सामना चार विकेटनं जिंकला.
कर्नाटक संघाने पहिल्या डावात 407 धावांचा डोंगर उभारला होता. यामध्ये कर्णधार मयांक अग्रवाल यानं द्विशतकी खेळी केली होती. मयांक अग्रवाल याने 429 चेंडूचा सामना करताना 249 धावा चोपल्या. या खेळीत त्यानं 28 चौकार आणि पाच षटकारांचा पाऊस पाडला होता. पण दुसऱ्या डावात कर्नाटकाला 234 धावाच करता आल्या. यामध्ये मयांकने 55 तर निकिन जोस याने शतक झळकावलं होतं. सौराष्ट्राचा कर्णधार अर्पित वासवदा याने दमदार प्रदर्शन करत द्विशतक झळकावलं. त्याच्या शतकी खेळीच्या बळावर सौराष्ट्राने पहिल्या डावात 527 धावांचा डोंगर उभारला होता. अर्पितने 406 चेंडूचा सामना करताना 202 धावा केल्या. या खेळीत त्याने 21 चौकार आणि एक षटकार लगावला. त्याशिवाय शेल्डन जॅक्सन याने पहिल्या डावात शतक झळकावलं. त्याने 23 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 160 धावांचा पाऊस पाडला. तर चिराग जाणी याने 72 धावांचं योगदान दिले. दुसऱ्या डावात अर्पितने 47 तर चेतन सकारिया याने 24 धावांचं योगदान दिले.
गतविजेत्या मध्य प्रदेशचं आव्हान संपुष्टात, बंगालची फायनलमध्ये धडक
रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या मध्य प्रदेशला पराभवाचा धक्का बसला आहे. बंगालने मध्य प्रदेशवर 306 धावांनी विजय मिळवला आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियम झालेल्या सामन्यात मध्य प्रदेशला विजयासाठी 548 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. पण मध्य प्रदेशचा संघ 241 धावांवर संपुष्टात आला. प्रदीप्ता प्रमानिक याने 10 षटकात 51 धावांच्या मोबदल्यात मध्य प्रदेशच्या अर्ध्या संघाला तंबूत धाडलं. तर मुकेश कुमार याने दोन जणांना बाद केले. मध्य प्रदेशकडून दुसऱ्या डावात रजत पाटीदार याने 52 धावांची खेळी केली. त्याशिवाय एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. बंगालकडून दमदार कामगिरी करणाऱ्या आकाश दीप याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पहिल्या डावात त्याने पाच विकेट घेतल्या होत्या.