Team India : संजू सॅमसननं फिटनेस टेस्ट केली पास, बुमराहच्या पुनरागमनाबाबतही अपडेट आले समोर, वाचा सविस्तर
IND vs AUS : समोर येणाऱ्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. दुखापतीमुळे तो बऱ्याच दिवसांपासून मैदानाबाहेर आहे.
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर (India vs Australia) येत आहे. या दौऱ्यात भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया चार कसोटी सामने तसंच तीन एकदिवसीय सामनेही खेळणार आहे. कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून तर वनडे मालिका 17 मार्चपासून सुरू होणार आहेत. दरम्यान या दौऱ्यात टीम इंडियाचे दोन स्टार क्रिकेटर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत पुनरागमन करू शकतात. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात दुखापतग्रस्त झालेला संजू सॅमसन कांगारूंविरुद्धच्या वनडे मालिकेत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडलेला जसप्रीत बुमराह देखील वनडेसाठी टीम इंडियात पुनरागमन करू शकतो.
सॅमसनने पास केली फिटनेस टेस्ट
या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 सामन्यात संजू सॅमसनला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मालिकेतून बाहेर व्हावे लागले. तो न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेचा भाग नाही. पण संजू सॅमसन गुडघ्याच्या दुखापतीतून आता सावरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कॅच घेण्याच्या प्रयत्नात संजू जखमी झाला होता. त्यानंतर त्याने कोचीमध्ये वैयक्तिक फिजिओसोबत त्याच्या दुखापतीवर उपचार केले. आता तो एनसीएमध्ये परतला आहे. त्याने फिटनेस चाचणी उत्तीर्ण केल्याचे दिसते.
इनसाइड स्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, संजू दुखापतीनंतर तो एनसीएमध्ये परतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार तो 100% तंदुरुस्त आहे बुमराहला तंदुरुस्त होण्यासाठी आणखी एक महिना लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी तो तंदुरुस्त होईल, अशी आम्हाला आशा आहे. पण हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. बुमराह सध्यारी पूर्णपणे फिट नाही.
बऱ्याच काळापासून बुमराहला संघाबाहेर
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मागील वर्षी इंग्लंड दौऱ्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्याला पाठीची दुखापत झाली होती. त्यानंतर तो वेस्ट इंडिज दौरा आणि आशिया चषक खेळू शकला नाही. यानंतर निवड समितीने त्याची संघात निवड करण्याची घाई केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत बुमराहला 6 षटकं टाकता आली होती. त्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेव्यतिरिक्त टी-20 विश्वचषकातून देखील बाहेर पडला. सध्या बुमराह रिहॅबमध्ये आहे. सध्या तो फिट नाही. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्याची संघात निवड झाली नाही. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 टक्के फिट असणे आवश्यक आहे. पण त्याला अजून एक महिना बाकी आहे.
हे देखील वाचा-