(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कसोटीत नव्या पर्वाला सुरुवात, रोहित झाला 35 वा कर्णधार, पाहा संपूर्ण रेकॉर्ड
Ind Vs SL, Team Announcement : भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी कसोटी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपवली आहे.
Ind Vs SL, Team Announcement : भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी कसोटी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपवली आहे. रोहित शर्मा आता तिन्ही प्रकारच्या (कसोटी, एकदिवसीय आणि टी 20) क्रिकेट संघाचा कर्णधार झाला आहे. गेल्यावर्षी रोहित शर्माला एकदिवसीय आणि टी 20 संघाची धुरा देण्यात आली होती. आता रोहितकडे कसोटी संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात आले आहे. रोहित शर्मा भारताचा 35 वा कसोटी कर्णधार झाला आहे.
सीके नायडू पहिले कसोटी कर्णधार -
रोहित शर्मा भारताचा 35 वा कसोटी कर्णधार झाला आहे. याआधी केएल राहुल भारताचा 34 वा कसोटी कर्णधार झाला होता. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकाविरोधात दुसऱ्या कसोटी सामन्यात के.एल राहुलने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. सीके नायडू भारतीय कसोटी संघाचे पहिले कर्णधार होते. नायडू यांनी 1932-34 या कालावधीत चार कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व स्विकारले होते. यामध्ये भारतीय संघाचा तीन सामन्यात पराभव झाला होता. तर एक सामना अनिर्णित राहिला होता.
विराट कोहली सर्वात यशस्वी कर्णधार -
विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील 68 कसोटी सामन्यात भारतीय संघाने 40 विजय मिळवले आहेत. तर 16 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. इतकेच नाही तर सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करण्याचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर आहे.
धोनी दुसऱ्या क्रमांकावर -
कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी भारतीय कसोटी इतिहासातील दुसरा यशस्वी कर्णधार आहे. धोनीने 60 सामन्यात भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केलं आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 27 कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. तर 18 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.
विराट कोहलीने दिला होता राजीनामा -
गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय कसोटी संघाचा पराभव झाला होता. त्यानंतर विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले होते. याआधी विराट कोहलीने टी0 संघाचे कर्णधरपद सोडले होते. तर एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन विराट कोहलीला पायउतार करण्यात आले होते. विराट कोहली आता फलंदाज म्हणून तिन्ही प्रकराच्या क्रिकेटमध्ये खेळत आहे. विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर भारतीय संघाची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे.
कसोटीतील यशस्वी तीन भारतीय कर्णधार
1. विराट कोहली- 68 कसोटी, 40 विजय, 17 पराभव
2. एमएस धोनी- 60 कसोटी, 27 विजय, 18 पराभव
3. सौरव गांगुली- 49 कसोटी, 21 विजय, 13 पराभव