Australia vs India 5th Test : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी गेले 2-3 महिने खूप वाईट गेले आहे. आधी त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड विरुद्ध भारताला घरच्या मैदानावर लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील शेवटचा सामना सिडनी येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून कर्णधार रोहित शर्माला (Rohit sharma) वगळण्यात आले. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सिडनी कसोटीत कर्णधार आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारताने एक कसोटीही जिंकली आहे. त्यावेळी रोहित शर्मा संघात नव्हाता. जिथे भारताने 295 धावांनी विजय मिळवला.


ॲडलेडमधील दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा संघात परतला आणि टीम इंडियाची कामगिरी घसरली. रोहितचा फलंदाजीचा फॉर्मही त्याला साथ देत नव्हता आणि सलग फ्लॉप ठरल्यानंतर त्याला सिडनी कसोटीतून वगळण्यात आले. मात्र, नाणेफेकीदरम्यान जसप्रीत बुमराहने सांगितले की, रोहितने स्वत: विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.


जेव्हा जसप्रीत बुमराह म्हणाला की, ड्रेसिंग रूममधील वातावरण चांगले आहे. रोहितने स्वत: ला विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हा चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र याच दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला, ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली. सिडनी कसोटीत खेळणाऱ्या टीम इंडियाचे प्लेअरशीट बाहेर आले असून त्यात रोहित शर्माचे नाव कुठेही दिसत नव्हते.






संघाच्या प्लेअरशीटमधून रोहितचे नाव गायब...


खरंतर, सोशल मीडियावर एक प्लेअरशीट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी भारताच्या एकूण 16 खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. या यादीत रोहितचे नाव नाही आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही या यादीच्या खाली स्वाक्षरी केली आहे. कसोटी संघात रोहित शर्माच्या अनुपस्थितीबद्दल बीसीसीआयने कोणतीही प्रेस रिलीझ जारी केली नाही किंवा सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट केली नाही. या यादीत प्लेइंग इलेव्हन व्यतिरिक्त सर्व फिट खेळाडूंचा समावेश होता, मात्र रोहित शर्माचे नाव कुठेच दिसले नाही. देवदत्त पडिक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल, अभिमन्यू इसवरन आणि हर्षित राणा यांचाही राखीव खेळाडूंच्या यादीत समावेश आहे.


रोहित शर्माने घेतली का निवृत्ती?


मेलबर्न कसोटीनंतर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, त्यांच्या बाजूने याला दुजोरा मिळालेला नाही. सिडनीमध्ये तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाल्यानंतर या अफवेला आणखी हवा मिळाली. आता संघाच्या प्लेअरशीटमध्ये रोहितचे नावही नाही. अशा स्थितीत रोहितची कसोटी कारकीर्द संपुष्टात आली आहे का, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.