Rohit Sharma, IND vs ENG : विराट-गिल फेल, रोहितने सावरला डाव, 18 हजार धावांचा पल्ला केला पार
Rohit Sharma, IND vs ENG : लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये इंग्लंडच्या संघाने भारताची आघाडीची फळी ध्वस्त केली.
Rohit Sharma, IND vs ENG : लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये इंग्लंडच्या संघाने भारताची आघाडीची फळी ध्वस्त केली. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूने कर्णधार रोहित शर्माने संयमी फलंदाजी केली. 40 धावांत भारताने तीन आघाडीचे फलंदाज माघारी परतले होते, त्यावेळी रोहित शर्माने राहुलला साथीला घेत डाव सावरला. रोहित शर्माने अर्धशतक ठोकत भारताच्या डावाला आकार दिला. रोहित शर्माने 47 धावा करताच मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावांचा पल्ला -
रोहित शर्माने इंग्लंडविरोधात 47 धावा करताच आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 20 हजार धावांचा पल्ला पार केला. 18,000 आंतरराष्ट्रीय धावा पार करणारा रोहित शर्मा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहितपूर्वी भारतीय फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी 18 हजार धावांचा पल्ला पार केला आहे.
Rohit Sharma joins the elite list. pic.twitter.com/nmLUlyQpjY
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 29, 2023
कर्णधार म्हणून रोहित शर्माचा 100 वा सामना -
रोहित शर्माने 2017 मध्ये पहिल्यांदा टीम इंडियाचे नेतृत्व संभाळले होते. तो तेव्हा नियमित कर्णधार नव्हता. मात्र विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा नियमित कर्णधार बनला. कर्णधार म्हणून आज रोहित शर्माचा आज 100 वा सामना होय.
रोहितने भारताचा डाव सावरला -
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने नाणेफेक जिंकून यजमान भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी शानदार सुरुवात केली. पण वोक्स याने गिल याला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर श्रेयस अय्यर पुन्हा एकदा बॉऊन्सर चेंडूवर बाद झाला. 1 बाद 26 वरुन भारताची अवस्था तीन बाद 40 अशी दैयनीय अवस्था झाली. पण त्यानंतर केएल राहुल याला साथीला घेत रोहित शर्माने डाव सावरला. केएल राहुल 37 चेंडूमध्ये 19 धावांवर खेळत आहे, यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. तर रोहित शर्माने 67 चेंडूत 57 धावांची खेळी केली. यामध्ये तीन षटकार आणि सहा चौकारांचा समावेश आहे.
श्रेयस अय्यर याला 16 चेंडूत 4 धावा करता आल्या. शुभमन गिल याला 13 चेंडूत 9 धावा करता आल्या. यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. विराट कोहलीला 9 चेंडूनंतरही खाते उघडता आले नाही.