Road Safety World Series 2022: रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामातील पहिला सामना नुकताच इंडिया लीजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्स (India Legends vs South Africa Legends) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात भारतीय दिग्गजांनी दमदार खेळ दाखवत 61 धावांनी विजय मिळवला आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून इंडिया लीजेंड्सच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यात स्टुवर्ट बिन्नी याने नाबाद 82 धावांची तुफानी खेळी करत संघाची धावसंख्य़ा 217 पर्यंत नेली. त्यानंतर संपूर्ण संघाने भेदक गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना 156 धावांत रोखत 61 धावांनी सामना जिंकला.
सामन्यात भारताच्या फलंदाजीदरम्यान सचिनने नमन ओझासोबत सलामीला येण्याचा निर्णय घेतला. दोघेही अनुक्रमे 16 आणि 21 धावा करुन बाद झाले. मग मिस्टर आयपीएल सुरेश रैनाने 33 धावा केल्या. पण स्टुवर्ट बिन्नी याने नाबाद 82 धावांची तुफानी खेळी करत महत्त्वाची कामगिरी केली. युसूफनेही 35 धावांची तुफानी नाबाद खेळी केली. ज्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला 218 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ मात्र 218 धावा करु शकला नाही. कर्णधार जॉन्टी रोड्सने नाबाद 38 धावा करत एकहाती झुंज दिली. पण तो संघाला विजय मिळवू देऊ शकला नाही. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू 156 च करु शकल्याने सामना भारताने 61 धावांनी जिंकला.
सचिनकडून मात्र निराशा
दिर्घकाळानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणाऱ्या सचिन तेंडुलकरला दक्षिण आफ्रिका लीजेंड्सविरुद्ध काही खास कामगिरी करता आली नाही. या सामन्यात त्यानं 15 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीनं 16 धावा केल्या. मखाया एनथिनीच्या गोलंदाजीवर सचिन तेंडुलकरनं आपली विकेट्स गमावली. सचिन बाद झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये काहीशी निराशा पाहायला मिळाली. परंतु, पुढच्या सामन्यात सचिन धमाकेदार फलंदाजी करेल आणि मोठी धावसंख्या करेल, अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.
अशी पार पडणार स्पर्धा
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामात आठ संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा 10 सप्टेंबर अर्थात आजपासून येत्या 1 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. या स्पर्धेच्या साखळी सामन्यात प्रत्येक संघ 5-5 सामने खेळेल. या स्पर्धेतील पहिला 7 सामने कानपूरमध्ये खेळवले जाणार आहेत. त्यानंतर इंदूरमध्ये 5 सामने, डेहराडूनमध्ये 6 आणि रायपूरमध्ये 2 सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील टॉपच्या चार संघांना उपांत्य फेरीत स्थान मिळेल. ज्यातील दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. अंतिम सामना 1 ऑक्टोबरला होणार आहे.
हे देखील वाचा-