नवी दिल्ली : टी 20 वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताला 10 गडी राखून धुळ चारली. पाकिस्तानचा विजय हा ऐतिहासिक असून तब्बल 29 वर्षांनंतर भारताला वर्ल्ड कपमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. आता यावरून राजकारण सुरु झालं असल्याचं चित्र आहे. पाकिस्तानचा भारतावरील विजय हा इस्लामचा विजय असल्याची मुक्ताफळं पाकिस्तानचे इंटेरिअर मिनिस्टर शेख रशिद यांनी उधळली आहेत. 


पाकिस्तानच्या विजयानंतर लगेचच शेख रशिद यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून शेख रशिद म्हणाले की, "भारत-पाकिस्तान दरम्यानच्या या सामन्यात भारतातील मुस्लिमांसहित जगभरातील मुस्लिमांच्या भावना या पाकिस्तानसोबत होत्या. पाकिस्तानसाठी हाच सामना हा वर्ल्ड कपचा अंतिम सामना होता. पाकिस्तानचा भारतावरील हा विजय म्हणजे इस्लामचा विजय आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी बॅरिकेट्स काढावेत आणि सर्व नागरिकांना जल्लोश साजरा करु द्यावा." 


 




पाकिस्तानच्या मंत्र्यांनी ही मुक्ताफळं उधळल्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. क्रिकेटसारख्या खेळाला पाकिस्तानने धार्मिक रंग दिल्याने अनेक स्तरातून त्यावर टीका होत आहे. 


युएईत (UAE) सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकात भारताची पराभवाने सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने (India Vs Pakistan) भारतावर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. भारताकडून मिळालेल्या 152 धावांचे लक्ष्य कर्णधार बाबर आझम आणि त्याचा सहकारी मोहम्मद रिझवानने सहज पूर्ण केले. पाकिस्तान विरोधातल्या या पराभवामुळे भारताचा विजयी रथ तब्बल 29 वर्षांनंतर रोखला गेला आहे. पाकिस्तानच्या या विजयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान यांनी संघाचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी एक फोटो ट्विट करत संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. पाकिस्तान विरोधात पराभव झाल्यानंतर भारताचा पुढील सामना न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान सोबत होणार आहे. 


महत्वाच्या बातम्या :