टी-20 विश्वचषकानंतर (T20 World Cup 2021) भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यानंतर भारतीय संघाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळणार असून माजी खेळाडू राहुल द्रविडने (Rahul Dravid) या पदासाठी अर्ज केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी घेण्यास राहुल द्रविडने सुरुवातीला नकार दिला होता. मात्र, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासोबत झालेल्या दिर्घ संभाषणानंतर राहुल द्रविडने या पदासाठी अर्ज केला. दरम्यान, श्रीलंका दौऱ्यावर असताना राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली होती. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेचा पराभव केला. मात्र, टी-20 मालिकेत भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेदरम्यान, भारतीय संघातील अनेक महत्वाचे खेळाडू कोरोनाच्या जाळ्यात अडकले होते. हे देखील भारताच्या पराभवाचे कारण असू शकते.


टी-20 विश्वचषकानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर राहुल द्रविड भारतीय संघाची कमान संभाळण्याची शक्यता आहे. राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षकापेक्षा मोठी जबाबदारी मिळू शकते, अशाही बातम्या प्रसारमाध्यमांत झळकत आहेत. राहुल द्रविडने अनेक वर्षे भारताच्या ज्युनियर खेळाडूंसाठी काम केले. त्याच्या प्रशिक्षणाखाली भारताने अंडर-19 संघासाठी विश्वचषक जिंकला आणि भारत 'अ' संघातील खेळाडूंना चांगले मार्गदर्शन केले. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतरही राहुल द्रविड भारत-अ आणि अंडर-19 संघांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याची चर्चा आहे. 


मुख्य प्रशिक्षकापेक्षा द्रविडची भूमिका मोठी असणार. ज्यामुळे त्यांचे मानधन जास्त असू शकते. भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना बीसीसीआयकडून साडेआठ कोटी मानधन देण्यात येते. मात्र, राहुल द्रविडला यापेक्षा अधिक मानधन मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआय द्रविडला 10 कोटी मानधन देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


दरम्यान, भारताचा माजी यष्टिरक्षक अजय रात्रा यांनी देखील भारतीय क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला. रात्रा यांनी 6 कसोटी आणि 12 एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त 99 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या या माजी खेळाडूला प्रशिक्षणाचा चांगला अनुभव आहे. ते सध्या आसामचे मुख्य प्रशिक्षक आहेत. आयपीएलमध्ये, त्याने दिल्ली कॅपिटल्समध्ये काम केले आहे. रात्रा यांनी ऋद्धिमान साहा आणि ऋषभ पंत यांसारख्या यष्टीरक्षकांसोबत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्येही काम केले.


संबंधित बातम्या-