Pakistan New Head Coach 2025: विराट कोहलीच्या मित्राची पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती; आरसीबी संघाचीही सांभाळलेली जबाबदारी
Pakistan New Head Coach 2025: पीसीबीने नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून एका अनुभवी खेळाडूची निवड केली आहे.

Pakistan New Head Coach 2025: पाकिस्तान क्रिकेट संघाची (Pakistan National Cricket Team) पुढील आंतरराष्ट्रीय मालिका बांगलादेशसोबत आहे. आगामी 25 मे पासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका घरच्या मैदानावर खेळणार आहे. यापूर्वी, पीसीबी (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) ने नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे.
पीसीबीने नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून एका अनुभवी खेळाडूची निवड केली आहे, ज्यांनी आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात विराट कोहलीसोबत काम केले आहे. तसेच पाकिस्तान संघाच्या या नवीन प्रशिक्षकांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावली. पाकिस्तान सुपर लीग संपल्यानंतर नवीन प्रशिक्षक पाकिस्तान संघासोबत सामील होईल.
माईक हेसन पाकिस्तानचे नवे मुख्य प्रशिक्षक (Mike Hesson named Pakistan new white ball coach)
माईक हेसन यांची पाकिस्तान क्रिकेटच्या व्हाईट-बॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माइक हेसन सध्या पाकिस्तानमध्ये आहे, जिथे तो पीएसएल संघ इस्लामाबाद युनायटेडसोबत आहे. माईक हेसनच्या आधी, आकिब जावेद 5 महिने अंतरिम प्रशिक्षक म्हणून काम करत होते. गॅरी कर्स्टन यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर आकिब यांनी प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. 50 वर्षीय माईक हेसन यांना प्रशिक्षणाचा भरपूर अनुभव आहे. माईक हेसनने सुमारे 6 वर्षे (2012 ते 2018) न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवले. यानंतर माईक हेसनने आयपीएलमध्येही काम केले. माइक हेसन 2019 मध्ये आरसीबी संघात सामील झाला, तो 2023 पर्यंत संघासोबत राहिला. तथापि, पीसीबीने अधिकृतपणे माईक हेसनची नियुक्ती जाहीर केली पण तो किती काळ राहील, करार किती काळाचा आहे? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र माईक हेसनसोबत 2 वर्षांचा करार करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाची पुढील मालिका-
पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक म्हणून माइक हेसनची पहिली मालिका बांगलादेशविरुद्ध असेल. 25 मे पासून सुरू होणाऱ्या या मालिकेत 5 टी-20 सामने खेळवले जातील. यानंतर संघाला वेस्ट इंडिजचा दौरा करावा लागेल. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी मुख्य प्रशिक्षकाच्या नियुक्तीबद्दल सांगितले की, न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध प्रशिक्षक माइक हेसन यांची पाकिस्तान पुरुष संघाच्या व्हाईट-बॉल मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती जाहीर करताना मला आनंद होत आहे.
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश टी-20 मालिकेचे वेळापत्रक-
पहिला सामना: 25 मे (इक्बाल स्टेडियम)
दुसरा सामना: 27 मे (इक्बाल स्टेडियम)
तिसरा सामना: 30 मे (गद्दाफी स्टेडियम)
चौथा सामना: 01 जून (गद्दाफी स्टेडियम)
पाचवा सामना: 03 जून (गद्दाफी स्टेडियम)
















