(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जय शाह आयसीसीचे अध्यक्ष होताच पाकिस्तानची भाषा बदलली; खिलाडूवृत्तीचं उदाहरण देत भूमिका केली स्पष्ट!
Champions Trophy 2025 Jay Shah ICC Chairman: भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचं बोललं जात आहे.
India participation Champions Trophy 2025 Jay Shah ICC Chairman: आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं (Champions Trophy 2025) आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात येणार आहे. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी देखील सुरु केली आहे. एक वेळापत्रक देखील पाकिस्तान किक्रेट बोर्डाने आयसीसीकडे सादर केले आहे. मात्र भारतीय क्रिकेट संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचं बोललं जात आहे.
बीसीसीआयने याबाबत मात्र अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. परंतु भारतीय संघाला पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीची (Champions Trophy 2025) स्पर्धा खेळण्यास यावं लागेल, अशी विधानं पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंकडून करण्यात येत आहे. मात्र आता नुकतेच भारताचे जय शाह (Jay Shah) यांची आयसीसीच्या (ICC) अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानची भाषा बदलल्याचं दिसून येत आहे. आता पाकिस्तानचे माजी खेळाडू युनूस खानने (Younis Khan) जय शाह यांना एक आवाहन केलं आहे.
युनूस खान काय म्हणाला?
आयसीसीचे नवे अध्यक्ष झाल्यानंतर जय शाह यांनी खिलाडूवृत्ती दाखवायला हवी, असं युनूस खान म्हणाला. आयसीसीचे नवनियुक्त अध्यक्ष जय शाह यांनी खिलाडूवृत्तीचा परियच देत आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवायला हवे, असे पाकचा महान फलंदाज युनूस खान याचे मत आहे. जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर क्रिकेटचा खेळ अधिक चांगल्या स्थितीत गेला पाहिजे. जय शाह हे आता बीसीसीआय सचिव नाहीत. त्यांनी क्रिकेटच्या विकासासाठी आणि भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी भारतीय संघाला पाकमध्ये खेळण्यासाठी आवश्यक पावले उचलायला हवी. आयसीसी प्रमुखांच्या पुढाकारामुळे भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी येऊ शकतो. त्याच प्रकारे पाकिस्तान भारताला भेट देऊ शकतो, असे युनूस खान म्हणाला.
पाकिस्तानने तयार केलेल्या वेळापत्रकात काय?
ICC ने काही काळापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाठवलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या प्रस्तावित वेळापत्रकाला मान्यता दिली होती. त्यांच्या मते टीम इंडियाचे सर्व सामने लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर खेळवले जातील. वेळापत्रकानुसार भारताला बांगलादेश, न्यूझीलंड आणि पाकिस्तानसह अ गटात ठेवण्यात आले आहे. भारताने उपांत्य फेरी गाठली तरी त्याचा सामना लाहोरमध्येच होणार आहे.
जय शाह यांची बिनविरोध निवड-
नवनियुक्त जय शाह 1 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. न्यूझीलंडचे विद्यमान आयसीसी अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. ग्रेग बार्कले 2020 पासून आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांनी तिसऱ्यांदा या पदावर राहण्यास नकार दिला होता, त्यानंतर जय शहा यांची या पदासाठी बिनविरोध निवड झाली. आयसीसीचे अध्यक्ष बनणारे जय शाह सर्वात तरुण भारतीय आहेत.
संबंधित बातमी:
आयपीएलच्या मेगा लिलावात रोहित शर्मावर 50 कोटींची बोली लावणार?; लखनौच्या मालकांनी सगळं सांगितलं!