Pakistan Cricketer Haris Rauf Video: पाकिस्तानचा क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) आणि त्यांच्या खेळाडूंसोबत सध्यातरी कोणत्याची चांगल्या गोष्टी होताना दिसत नाहीय. बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ 2024 च्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफच्या (Haris Rauf Video) व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे. हारिस रौफचा एक व्हिडीओ कालपासून व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका पाकिस्तानी चाहत्यावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
अमेरिकेत पत्नीसोबत फिरत असताना हारिस रौफला चाहत्याने चिथावणी दिली. यानंतर तो खूपच अस्वस्थ झाला आणि त्याने चाहत्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रागात असलेला हारिस पायातील चप्पल काढून चाहत्याच्या अंगावर त्वेषाने धावून जाताना दिसला; मात्र तिथे असलेल्या इतर लोकांनी त्याला वेळीच अडवले. त्यामुळे दोघांमध्ये कोणतीही हाणामारी झाली नाही. दरम्यान, तू नक्कीच भारतीय असशील, पण हा काही भारत नाही, असे हारिसने त्या चाहत्याला म्हटले. पण त्याने मी पाकिस्तानी असल्याचे सांगितल्यानंतर हारिस रौफ त्याला अधिक शिवीगाळ करायला लागला.
हारिस रौफ काय म्हणाला?
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हारिस रौफने स्पष्टीकरण दिलं आहे. हारिस रौफ म्हणाला की, मी ठरवलं होतं की ही गोष्ट सोशल मीडियावर टाकायची नाही. पण हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. त्यामुळे तेव्हा नेमकं काय घडलं हे सांगणं भाग पडलं आहे. चाहत्यांना आमच्यावर टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण कोणी जर माझ्या आईवडिलांवर गेला तर मी त्यावेळी प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या प्रोफेशनचा राग त्यांच्यावर काढू नये, असं रौफ ट्विट करत म्हणाला.
पाहा संपूर्ण व्हिडीओ-
विश्वचषकातील पाकिस्तानची कामगिरी -
अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तान संघाला चार सामन्यात दोन पराभवाचा सामना करावा लागला. अमेरिका आणि भारताने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानला दुबळ्या कॅनडा आणि आयर्लंडविरोधात विजय मिळवता आला. आयर्लंडविरोधातही पाकिस्तानचा विजय रडतखडतच झाला.