T20 World Cup 2026: टी20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेमध्ये (T20 World Cup 2024) अनेक संघांनी जोरदार कामगिरी केली. यावेळी कमकुवत समजल्या जाणाऱ्या संघांनीही आपली ताकद दाखवली. अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या कामगिरीने चाहत्यांची मने जिंकली. अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव केला होता. आता टी20 विश्वचषक 2026 साठी पात्र ठरलेल्या संघांची यादी आली आहे. यामध्ये एकूण 12 संघ आहेत. याशिवाय 8 संघ पात्रता फेरीतून प्रवेश घेणार आहेत.
2026 टी-20 विश्वचषक भारत आणि श्रीलंकेत आयोजित केला जाणार आहे. या विश्वचषकासाठी भारत आणि श्रीलंकेसोबतच पाकिस्तान आणि बांगलादेशही त्यासाठी पात्र ठरले आहेत. या यादीत वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाचीही नावे आहेत. टी20 विश्वचषक 2026 साठी अमेरिका देखील भारतात येणार आहे. टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 साठी अमेरिकेचा संघही पात्र ठरला आहे. यासोबतच अफगाणिस्ताननेही एन्ट्री घेतली आहे. अफगाणिस्तानने एकुण 4 सामने खेळले आहेत. यामध्ये तीन सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवला.
टी20 विश्वचषक 2026 ची स्पर्धा भारत अन् श्रीलंकेत रंगणार-
टी20 विश्वचषक 2026 भारत आणि श्रीलंकेमध्ये आयोजित केला जाणार आहे. ही स्पर्धा फेब्रुवारीमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये 12 संघ पात्र ठरले आहेत. तर 8 संघ पात्रता फेरीतून येतील. 20 संघांमध्ये एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेचे अजून वेळापत्रक जाहीर झालेले नाही.
T20 विश्वचषक 2026 साठी पात्र ठरलेले संघ –
- भारत
- श्रीलंका
- ऑस्ट्रेलिया
- अफगाणिस्तान
- बांगलादेश
- इंग्लंड
- दक्षिण आफ्रिका
- यूएसए
- वेस्ट इंडीज
- न्यूझीलंड
- आयर्लंड
- पाकिस्तान
उर्वरित 8 संघ कसे पात्र ठरणार?
युरोप क्वालिफायरमधून 2 संघ, ईस्ट एशिया पॅसिफिक क्वालिफायर व अमेरिकन्स क्वालिफायरमधून प्रत्येकी 1-1 संघ आणि एशिया क्वालिफायर व आफ्रिका क्वालिफायरमधून प्रत्येकी 2-2 संघ वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणार आहेत.
2024 च्या विश्वचषकात रंगणार सुपर 8 चा थरार-
सुपर 8 मध्ये प्रवेश केलेल्या आठ संघांची विभागणी दोन गटात करण्यात आलेली आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि ड गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ यांचा एक गट आहे. तर, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे एका गटात असतील.