PAK vs ENG: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामधील तीन कसोटी सामन्यातील दुसरा सामना शुक्रवारी ( 9 डिसेंबर ) होणार आहे. रावळपिंडी येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला होता. तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला इंग्लंड संघाच्या हॉटेलजवळ गोळी चालवल्याचा आवाज आला. या गोळीबाराच्या घटनेमुळे इंग्लंड संघाला पाकिस्तानमध्ये मिळालेल्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
17 वर्षानंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला मुल्तानमध्ये गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. गोळीबाराची ही घटना इंग्लंडचा संघ राहत असलेल्या हॉटेलच्या जवळ घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनसार, या प्रकरणी पाकिस्तान पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. इंग्लंडचा संघ ट्रेनिंगसाठी निघणार होता, त्यापूर्वी ही गोळीबार झाल्याची घटना घडली. त्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली. काहींनी पाकिस्तानमध्ये हे रोजचं असल्याचं म्हटलेय.
बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाला पाकिस्तानमध्ये राष्ट्रपती स्तराची सुरक्षा देण्यात आली आहे. हॉटेलजवळ झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा इंग्लंड संघाच्या ट्रेनिंग सेशनवर कोणताही परिणाम झाला नाही. कडेकोठ सुरक्षा व्यवस्थेत इंग्लंडच्या खेळाडूंना मैदानावर नेहण्यात आले. तिथे इंग्लंडच्या खेळाडूंनी अभ्यास केला. शुक्रवारी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. तीन सामन्याच्या मालिकेत इंग्लंडचा संघ 1-0 ने आघाडीवर आहे.