मुंबईकर सौरभ नेत्रावळकरपुढे पाकिस्तान चारीमुंड्या चीत, सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेनं लोळवलं! इतिहासातील सर्वात वाईट पराभव
Saurabh Netravalkar : मूळचा मुंबईकर आणि मराठमोळा सौरभ नेत्रावळकर अमेरिकेच्या या ऐतिहासिक विजयाचा एक प्रमुख शिल्पकार ठरला.सौरभ नेत्रावळकर याच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानचा संघ चारीमुंड्या चीत झाला.
Saurabh Netravalkar T20 World Cup 2024 : ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या साखळीत पाकिस्तानला सलामीलाच धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. यजमान अमेरिकेनं बलाढ्य पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पाच धावांनी पराभव करून नवा इतिहास घडवला. मूळचा मुंबईकर आणि मराठमोळा सौरभ नेत्रावळकर अमेरिकेच्या या ऐतिहासिक विजयाचा एक प्रमुख शिल्पकार ठरला. या सामन्यात अमेरिकेनं पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 19 धावांचं आव्हान दिलं होतं. पण सौरभ नेत्रावळकरनं सुपर ओव्हरमध्ये इफ्तिकार अहमदला बाद करून पाकिस्तानला केवळ 13 धावाच दिल्या. त्यामुळं अमेरिकेला पाच धावांनी सनसनाटी विजय साजरा करता आला. अमेरिकेचा हा गटातला दुसरा विजय ठरला. या सामन्यातल्या पराभवानं पाकिस्तानवरचं दडपण वाढलं असून, रविवारच्या साखळी सामन्यात पाकिस्तानसमोर भारताचं आव्हान आहे.
सौरभ नेत्रावळकर याच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानचा संघ चारीमुंड्या चीत झाला. सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानसारख्या तगड्या फलंदाजीसमोर सौरभनं फक्त 13 धावा देत 19 धावांचा यशस्वी बचाव केला. डावखुरा सौरभ हा मूळचा मुंबईचा आहे. त्यानं अंडर 19 मध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलेय. त्याशिवाय मुंबईच्या रणजी संघाचा सदस्यही राहिलाय. मात्र चांगल्या संधींसाठी तो अमेरिकेत गेला होता. सौरभच्या यशामुळे भारतीय चाहतेही भलतेच खूश झाले आहेत. सूर्यकुमार यादव यानेही सौरभसाठी इन्स्टाग्रावर पोस्ट लिहिली आहे.
सौरभने पाकिस्तानविरोधात भेदक मारा करताना चार षटकात फक्त 18 धावा खर्च केल्या. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये 19 धावांचा यशस्वी बचाव केला. पॉवरप्लेमध्ये सौरभ यानं तीन षटकांमध्ये फक्त सहा धावा खर्च करत एक विकेट घेतली होती. डावखुऱ्या सौरभच्या गोलंदाजीसमोर बाबर आझमही अडखळत होता. बाबर आझम याला सौरभची गोलंदाजी खेळता येत नव्हती.
SAURABH NETRAVALKAR from Mumbai, came to the USA, did his Computer science [Masters degree] then working at Oracle & now winning the Super over against Pakistan in the World Cup 🌟
— Johns. (@CricCrazyJohns) June 6, 2024
- What a beautiful story....!!!! pic.twitter.com/O5G5XmAEGD
देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी -
डावखुऱ्या सौरभ नेत्रावळकर याचा जन्म 1991 मध्ये मुंबईत झाला. कूचबिहार ट्रॉफीमध्ये 2008-09 त्यानं 6 सामन्यांत 30 बळी घेतले होते. त्यानंतर 2010 च्या अंडर-19 विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली.सौरभनं 22 डिसेंबर 2013 रोजी मुंबईसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं होतं. फेब्रुवारी 2014 रोजी त्यानं लिस्ट-ए क्रिकेटमध्ये मुंबईसाठी पदार्पण केलं. त्यानंतर तो मुंबईसोबत विजय हजारे ट्रॉफीमध्येही खेळला.
अंडर 19 च्या संघाचा सदस्य -
2010 मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत सौरभ नेत्रावळकर टीम इंडियाचा सदस्य होता. केएल राहुल, जयदेव उनाडकट आणि मयंक अग्रवाल यांच्यासह तो भारतासाठी खेळला होता. 2010 अंडर-19 विश्वचषकात भारतीय संघ प्लेऑफ फेरीतून बाहेर पडला. 2010 च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत सौरभनं 6 सामन्यांत 9 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचचा इकॉनॉमी रेट 3.11 होता. सौरभशिवाय स्पर्धेतील इतर तीन खेळाडूंनी सिनियर टीम इंडियामध्ये स्थान मिळवलं, पण सौरभला मुकावं लागलं. यानंतर त्यानं रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीसह इतर भारतीय देशांतर्गत स्पर्धांमध्येही भाग घेतला.
सौरभ हा व्यवसायानं सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्यानं मुंबईतील विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. तो सध्या ‘ओरॅकल’ या सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत आहे. त्याची लिंक्डइन प्रोफाईल सध्या चर्चेत आहे. जानेवारी 2018 मध्ये सौरभनं अमेरिकन संघात स्थान मिळवलं.
The LinkedIn Profile of SAURABH NETRAVALKAR 🥶 pic.twitter.com/qBn5HajI30
— Johns. (@CricCrazyJohns) June 6, 2024