Mohammad Shami : भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील (England vs India ODI Series) पहिल्याच सामन्यात भारताने 10 विकेट्सनी दमदार विजय मिळवला. यावेळी भारताच्या वेगवान गोलंदाजांनी अत्यंत उत्तम गोलंदाजी करत इंग्लंडला अवघ्या 110 धावांवर सर्वबाद केलं. यावेळी जसप्रीत बुमराहने 6 तर शमीने 3 विकेट्स घेतल्या. बुमराहने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली असली तरी शमीची खेळीही महत्त्वपूर्ण ठरली, दरम्यान सामन्यानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या या अप्रतिम कामगिरीमागील गुपित मोहम्मद शमी याने स्वत: सांगितलं.
शमी सामन्यानंतर बोलिंग कोच पारस म्हाम्ब्रे यांच्याशी बोलताना म्हणाला,''आम्ही जेव्हा गोलंदाजीला सुरुवात केली, तेव्हा बॉल थोडा थांबून जात होता, तसंच सीमही होत होता. अशामध्ये एका नेमक्या टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं होतं. अशामध्ये सर्वच गोलंदाजांनी चांगलं प्रदर्शन दाखवलं.'' पुढे बुमराहबद्दल बोलताना शमी म्हणाला,'आम्ही बऱ्याच काळापासून एकत्र खेळत आहोत. त्यामुळे कसं खेळायचं कशी रणनीती असेल हे नेमकं कळतं. कुठून बॉल स्वींग होईल, कुठे सीम असेल? याचा अंदाज येतो. बुमराहनेही लेंथ फॉलो केली आणि एकामागे एक विकेट्स मिळवल्या.''
पाहा व्हिडीओ -
शमीने केला नवा रेकॉर्ड
भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या एकदिवसीय सामन्यात मोहम्मद शमी एका दमदार रेकॉर्डला गवसणी घातली आहे. शमीने सामन्यात तिसरा विकेट घेताच 150 एकदिवसीय विकेट्स पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे शमीने अगदी जलदगतीने हे विकेट्स पूर्ण करत जलदगतीने 150 एकदिवसीय विकेट पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे. अफगाणिस्तानच्या राशिद खानसोबत शमी तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. दोघांनीही 80 सामन्यांत ही कामगिरी करुन दाखवली आहे.
हे देखील वाचा-