Mohammad Shami : भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या वन-डेमध्ये श्रीनाथच्या रेकॉर्डवर असणार शमीची नजर, वाचा सविस्तर
India Vs Autralia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना 22 मार्च रोजी खेळवला जाणार असून हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे.
India vs Australia 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटचा सामना 22 मार्च रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. सध्याच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 सामने जिंकून बरोबरीवर आहेत. त्यामुळे तिसरा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार आहे. दरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसाठी (Mohammad Shami) हा सामना खास आहे. तिसऱ्या वनडेमध्ये शमी टीम इंडियाचा माजी गोलंदाज जवागल श्रीनाथचा विक्रम मोडू शकतो. यासाठी शमीला केवळ दोन विकेट्सची गरज आहे.
काय आहे विक्रम?
जवागल श्रीनाथ हा एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 29 एकदिवसीय सामन्यांमध्ये 33 बळी घेतले आहेत. दरम्यान, 30 धावांत चार विकेट घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 21 सामन्यांत 32 बळी घेतले आहेत. जवागल श्रीनाथचा विक्रम मोडण्यासाठी त्याला 2 विकेट्सची गरज आहे. शमीने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कांगारू संघाविरुद्ध 2 विकेट घेतल्यास तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज बनेल. तसे पाहता, भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात कपिल देवने सर्वाधिक 45 आणि अजित आगरकरने 36 विकेट घेतल्या आहेत.
करा या मरोचा सामना
चेन्नईत होणारा तिसरा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो असा आहे. जो संघ हा सामना जिंकेल त्याच्याकडे ट्रॉफी असेल. भारतीय संघाने मायदेशात दीर्घकाळ एकदिवसीय मालिका गमावलेली नाही. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या संघाला हा विक्रम कायम राखायचा आहे. त्याचबरोबर भारताविरुद्धची कसोटी मालिका 2-1 ने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला अलीकडच्या काळात वनडे मालिका जिंकायची आहे. कसोटी मालिकेदरम्यान, नागपूर कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला. त्याचवेळी दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने कांगारूंवर 6 गडी राखून विजय मिळवला. तर इंदूरमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 9 विकेट्सने पराभव केला. अहमदाबादमध्ये उभय संघांमध्ये खेळलेली शेवटची कसोटी अनिर्णित राहिली.
कधी, कुठे पाहाल सामना?
भारत आणि ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामना 22 मार्चला भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 1 वाजता टॉस होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1 या चॅनेलवर दुपारी 1.00 वाजता सुरु होईल. तसंच या सामन्याचं ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार या अॅप आणि वेबसाइटवरुन पाहता येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :