मुंबई: रोहित शर्मानं जिथं क्रिकेटचे धडे घेतले तिथली खेळपट्टी आणि नेटस म्हाडानं हटवले आहेत. रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड हे गोराई येथे मुला मुलींना क्रिकेटचं प्रशिक्षण देत होते. रोहित शर्मानं मुंबईतील गौराई येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं होतं. तिथल्या मैदानाची मालकी म्हाडाकडे होती. त्या मैदानावर क्रिकेटसह फुटबॉल देखील खेळलं जातं. त्या मैदानाचा व्यावसायिक वापर होत असल्याचं कारण देत म्हाडानं टर्फ हटवलं होतं. एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर म्हाडाच्या वरिष्ठ अधिकऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर टर्फ बांधण्यास म्हाडानं एनओसी दिली आहे.
म्हाडानं एस्वीआयएस मैदानावरील क्रिकेट टर्फ आणि फुटबॉल नेट हटवलं होतं. म्हाडानं यासंदर्भात दावा केला होता की याचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्यानं तोडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई बुधवारी, गुरुवारी करण्यात आली होती.
टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या अमृता वर्मा यांनी इथं मोफत प्रशिक्षण दिलं जात असल्याचं म्हटलं. रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी 29 वर्ष अनेक खेळाडूंना मोफत प्रशिक्षण दिलं आहे. म्हाडाकडे तोडक कारवाई रोखण्यासाठी वेळ मागितला मात्र त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही, असं वर्मा म्हणाल्या.
दिनेश लाड भावूक
ज्या ठिकाणी सराव करून, क्रिकेटचे धडे गिरवून, कोच दिनेश लाड यांच्याकडून शिकवणी घेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा मोठा झाला आणि आज भारताचे प्रतिनिधित्व करतोय त्याच जागेवर म्हाडाने कारवाई करून सरावासाठी वापरले जाणारे टर्फ उखडून टाकले आहे. यासाठी म्हाडाने एका तक्रारीचा आधार घेतला आहे, ज्यात या टर्फचा उपयोग व्यावसायिक कारणासाठी केला जातोय असे म्हटले होते. मात्र गेली 29 वर्ष कोच दिनेश लाड यांनी याच मैदानात रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर सारखे असंख्य क्रिकेटपटू घडवले. आता त्यांनी मुलींना देखील प्रशिक्षण सुरू केले होते. त्यांच्याच डोळ्यादेखत त्यांनी उभारलेले हे विश्व कारवाई करून म्हाडाने काढून टाकले. ही कारवाई करू नये यासाठी त्यांनी म्हाडाला 2 दिवस आधी विनंती देखील केली होती. मात्र त्याच काही उपयोग झाला नाही. इतक्या वर्षाची मेहेनत एका दिवसात नाहीशी झाल्याने लाड सर भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, टर्फला म्हाडाकडून एनओसी
म्हाडानं टर्फचं तोडकाम केल्यानंतर एबीपी माझानं दिशेन लाड यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी सरकारची, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मदत मागितली होती. त्यांनी दहिसरचे मैदान कायमस्वरूपी आणि मोफत मला देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. कोणताही मोबदला न घेता लाड सर क्रिकेट शिकवत असल्याने दहिसरच्या मैदानाचे भाडे त्यांना परवडत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. एबीपी माझानं या संदर्भातील बातमी प्रसिद्ध केल्यानंतर म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर म्हाडाकडून वाणिज्यिक वापर न करण्याच्या अटीवर एनओसी देण्यात आली. ही एनओसी पुढील एक वर्षासाठी देण्यात आली आहे.
दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहीर यांनी आता पुढची पिढी टर्फ मधूनच घडणार आहे. कारण मैदानं खूप कमी राहिली आहेत. यामध्ये दुर्दैवाचा हे आहे की रोहित शर्मा जिथे खेळला त्या टर्फवर तोडक कारवाई म्हाडा करते. उलट अधिकाधिक टर्फ ला परवानगी दिली जावी असं आम्हाला वाटतं.
इतर बातम्या :