पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत सातव्या दिवशी पहिल्या लढतीत राहुल त्रिपाठी(नाबाद ६७धावा) याने केलेल्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स संघाने छत्रपती संभाजी किंग्स संघाचा डकवर्थ लुईस पद्धतीने १० गडी राखून पराभव करत पहिला विजय मिळवला.  


गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुणतालिकेत तळाच्या स्थानी असलेल्या कोल्हापूर संघाने दुसऱ्या स्थानी असलेल्या छत्रपती संभाजी किंग्स संघाचा पराभव करून विजयाचे खाते उघडले. सौरभ नवले(३धावा), दिग्विजय पाटील(९)हे सलामीचे फलदांज स्वस्तात बाद झाले. त्यानंतर ओमकार खाटपेने ३१ चेंडूत ३८ धावाची संयमी खेळी केली. त्याने ४ चौकार व २ षटकार खेचले. ओम भोसले व ओमकार खाटपे या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ३३चेंडूत ३८धावाची भागीदारी केली. ओम भोसले व ओमकार खाटपे हे बाद झाल्यावर सौरभ सिंगने २१ धावा काढून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. छ्त्रपती संभाजी किंग्स संघ १७व्या षटकात ६गडी १२२धावा असताना पाऊस सुरु झाला. पावसाच्या व्यत्ययामुळे विजयासाठी पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाला ११ षटकात ९३धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.   कोल्हापूर टस्कर्स संघाकडून निहाल तुसामत(२-१७), योगेश डोंगरे(१-३), श्रीकांत मुंढे(१-१४), यश खळदकर (१-२७) यांनी सुरेख गोलंदाजी केली. 


 ९३ धावांचे आव्हान पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने ७.२षटकात एकही गडी न गमावता पूर्ण केले. यात कर्णधार राहुल त्रिपाठीने २९चेंडूत नाबाद ६७धावांची खेळी करून छत्रपती संभाजी किंग्सच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.त्यात त्याने ११चौकार व २ षटकार ठोकत मैदान दणाणून सोडले. त्याला अंकित बावणेने १५चेंडूत ३चौकार व १षटकाराच्या मदतीने नाबाद २६धावा काढून साथ दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ४४चेंडूत ९४ धावाची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. 


निकाल: साखळी फेरी:


छत्रपती संभाजी किंग्स : १७षटकात ६बाद १२६धावा(ओमकार खाटपे ३९(३१,४x४,२x६), ओम भोसले २१, सौरभ सिंग २१, शामसुजमा काझी नाबाद ८, राजवर्धन हंगर्गेकर नाबाद ४, निहाल तुसामत २-१७, योगेश डोंगरे १-३, श्रीकांत मुंढे १-१४, यश खळदकर १-२७) पराभुत वि.पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स: ७.२ष टकात बिनबाद ९४धावा(राहुल त्रिपाठी नाबाद ६७(२९,११x४,२x६), अंकित बावणे नाबाद २६(१५,३x४,१x६)); सामनावीर - राहुल त्रिपाठी; पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स संघ डीएलएस पद्धतीनुसार १० गडी राखून विजयी.