Jannik Sinner Win Wimbledon 2025: इटलीच्या यानिक सिनर (Jannik Sinner) याने ग्रॅण्ड स्लॅममधील मानाच्या विम्बल्डन स्पर्धेचं (Wimbledon 2025) जेतेपद पटकावून नवा इतिहास घडवला. यानिक सिनरनं अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कराजचा (Carlos Alcaraz) 4-6, 6-4, 6-4, 6-4 असा पराभव करुन पहिल्यांदाच विम्बल्डन विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.
24 वर्षांचा यानिक सिनर विम्बल्डन जिंकणारा आजवरचा पहिलाच इटालियन खेळाडूही ठरला. या निर्णायक लढतीत गेल्या दोन विम्बल्डन स्पर्धांचा विजेता असलेल्या अल्कराजनं पहिला सेट जिंकून आघाडी घेतली होती. मात्र यानिक सिनरनं त्यानंतरच्या सलग तीन सेट्समध्ये वर्चस्व गाजवलं. सिनरचं आजवरचं हे चौथं जेतेपद ठरलं.
तीन ग्रँड स्लॅम विजेतीपदही यानिक सिनरच्या नावावर-
टेनिसच्या हार्ड कोटवर याआधी तीन ग्रँड स्लॅम विजेतीपदं नावावर करणारा यानिक सिनर यंदा पहिल्यांदाच विम्बल्डनच्या फायनलमध्ये पोहोचला होता. दरम्यान विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर त्यानं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी अल्कराजचं आव्हान यावेळी मात्र मोडून काढलं. यंदाच्या वर्षातल्या सलग तिसऱ्या फायनलमध्ये खेळणाऱ्या या दोघांच्या लढतीत यावेळी यानिक सिनरनं बाजी मारली.
कोण आहे यानिक सिनर? (Who Is Jannik Sinner)
यानिक सिनर 24 वर्षांचा इटालियन खेळाडू आहे. यानिक सिनर हा तीन वर्षांचा असल्यापासून एक प्रतिभावान स्कीअर होता. वयाच्या आठव्या वर्षी त्याने जायंट स्लॅलममध्ये राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकले आणि वयाच्या 12 व्या वर्षी तो राष्ट्रीय उपविजेता ठरला. तथापि, वयाच्या 13 व्या वर्षी सिनर टेनिसकडे वळला आणि रिकार्डो पियाटी यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी बोर्डिघेरा येथे गेला. यानिक सिनरने अवघ्या 16 व्या वर्षी व्यावसायिक स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने आधीच अनेक एटीपी चॅलेंजर टूर जिंकली होती. 2019 मध्ये, यानिक सिनरने जागतिक क्रमवारीत टॉप 100 मध्ये स्थान मिळवले आणि नेक्स्ट जनरेशन एटीपी फायनल्स तसेच एटीपी न्यूकमर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला.
अल्काराजच्या हॅट्ट्रिकचं स्वप्न भंगले-
विम्बल्डन 2025 मध्ये यानिक सिनरच्या विजयानं कार्लोस अल्काराजचं सलग तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याचं स्वप्न भंगलं. 2023 आणि 2024 मध्ये नोवाक जोकोविचला पराभूत करून अल्काराजने दोन वर्षं सलग विम्बल्डन जिंकलं होतं. यंदा मात्र सिनरने त्याला ‘हॅट्ट्रिक चॅम्पियन’ होण्यापासून रोखलं. विशेष म्हणजे, सिनर विम्बल्डन एकेरी विजेतेपद पटकावणारा पहिला इटालियन खेळाडू बनला आहे. त्याआधीही सिनरने आपल्या खेळाचं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं, ऑस्ट्रेलियन ओपन 2024 व 2025, तसेच यूएस ओपन 2024 अशी तीन ग्रँड स्लॅम ट्रॉफी त्याने आधीच आपल्या नावावर केली होती.