WTC 2023 : विराटसह सात जणांची पहिली तुकडी इंग्लंडला रवाना होणार
WTC Final 2023 : आयपीएलमध्ये आव्हान संपलेल्या संघातील टीम इंडियाचे खेळाडू 23 मे रोजी इंग्लंडला रवाना होणार आहेत.
WTC Final 2023 : आयपीएलमध्ये आव्हान संपलेल्या संघातील टीम इंडियाचे खेळाडू 23 मे रोजी इंग्लंडला रवाना होणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपच्या फायनलसाठी हे खेळाडू इंग्लंडला रवाना होणार आहे. पहिल्या तुकडीमध्ये विराट कोहलीसह सात खेळाडूंचा समावेश आहे. त्याशिवाय कोच राहुल द्रविडही या खेळाडूंसोबत रवाना होणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या 'द ओव्हल' येथे खेळवण्यात येणार आहे. 7 जून, 2023 पासून सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे संघ ठरले, ठिकाण ठरलं आणि दिवसही ठरला, मग आता विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर नाव कोण कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आयपीएलमधील आव्हान संपलेल्या सहा संघातील खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपच्या फायनलसाठी इंग्लंडला रवाना होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी 23 मे रोजी विराट कोहली, अश्विन, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनादकट रवाना होणार आहेत.
Kohli, Ashwin, Axar, Thakur, Siraj, Umesh, Unadkat will leave for the UK tomorrow ahead of WTC final. [Sportstar] pic.twitter.com/1uwL6OGVev
— Johns. (@CricCrazyJohns) May 22, 2023
वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपसाठी टीम इंडिया India’s squad for WTC final :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा , विराट कोहली, अजिंक्य रहाणे , केएस भरत (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटले, शार्दुल ठाकूर, मोहम्द शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर)
टीम ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.
विराट दुखापतग्रस्त -
आयपीएलमधील अखेरच्या साखळी सामन्यात विराट कोहलीला दुखापत झाली आहे. आरसीबीचे गोलंदाजी कोच संजय बांगार यांनी याबाबतची माहिती दिली. विराटची दुखापत गंभीर नाही. विराटने शतकी खेळीकेल्यानंतर फिल्डिंगमध्ये विजय शंकरचा शानदार कॅच घेतला होता. हा कॅच घेताना त्याला दुखापत झाल्याचे बांगर यांनी सांगितले. विराट कोहली विजय शंकरने मारल्या बॉलला कॅच पकडण्यासाठी गेला, त्यावेळी त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. मैदानात फिजियोथेरपिस्ट आले. त्यांनी कोहलीला मदत करून मैदानाबाहेर आणलं. विराट कधीपर्यंत मैदानात परतेल याबाबत अजून कोणतंही व्यक्तव्य करण्यात आलं नाही. पण विराट कोहलीची दुखापत टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे.
टीम इंडियामागे दुखापतींचं ग्रहण
आगामी काळात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. याआधी टीम इंडियामागे दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. अनेक भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला 1 मे रोजी इकाना स्टेडियमवरील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरोधातील सामन्यादरम्यान जखमी झाली. त्याच्या उजव्या मांडीला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपला मुकणार आहे. त्याआधी श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत हे दिग्गजही दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपमधून बाहेर गेलेत. त्याशिवाय जयदेव उनाडकट, उमेश यादव आणि शार्दूल ठाकूर यांनाही थोडीफार दुखापत असल्याचे समोर आलेय.