T20 World Cup 2024 : केएल राहुल संघात हवाच होता, सुनिल शेट्टीच्या जावयासाठी रितेश मैदानात!
KL Rahul T20 World Cup 2024 : टी20 विश्वचषकाच्या 15 सदस्यीय संघात केएल राहुल याला स्थान मिळालं नाही. त्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख ही केएल राहुलसाठी मैदानात उतरलाय.
KL Rahul T20 World Cup 2024 : टी20 विश्वचषकाच्या 15 सदस्यीय संघात केएल राहुल याला स्थान मिळालं नाही. त्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख ही केएल राहुलसाठी मैदानात उतरलाय. केएल राहुल विश्वचषकाच्या संघात हवा होता, असं मत रितेश देशमुख यानं व्यक्त केले आहे. टीम इंडियाची विश्वचषकासाठी निवड झाल्यानंतर रितेश देशमुख यानं सोशल मीडियावर पोस्ट करत आपलं मत व्यक्त केलेय. रितेश देशमुखच्या पोस्टला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. नेटकऱ्यांकडून रितेश देशमुखच्या वक्तव्याला दुजोरा दिला जात आहे. होय, रितेश संघात हवा होता. त्याला आणखी एक संधी द्यायला हवी होती, असं मत अनेकांनी व्यक्त केले आहे. रितेश देशमुखची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आगामी टी20 विश्वचषकासाठी आज टीम इंडियाच्या शिलेदारांची निवड झाली. यामध्ये विकेटकीपर फलंदाज म्हणून संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. त्यामुळे केएल राहुल याचा पत्ता कट झाला आहे. 2022 विश्वचषकात केएल राहुल टीम इंडियाचा उपकर्णधार होता, पण यंदा त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. आयपीएलमध्ये केएल राहुल लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आहे. राहुलने यंदाच्या हंगामात शानदार कामगिरी केली आहे, त्यानं नऊ सामन्यात 378 धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये तीन अर्धशतकाचा समावेश आहे. त्यानंतरही राहुल याची निवड झालेली नाही. त्यामुळे रितेश देशमुख नाराज झालाय. त्यानं आपली नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली.
KL Rahul should have been there in the #T20WorldCup squad.
— Riteish Deshmukh (@Riteishd) April 30, 2024
केएल राहुल संघाबाहेर का? -
विश्वचषकासाठी टीम इंडियानं ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या विकेटकीपरला संधी दिली. पंत आणि सॅमसन दोन्ही विस्फोटक फलंदाजी करण्यात तरबेज आहे. दोघांनी आयपीएलमध्ये राहुलपेक्षा थोडी सरस कामगिरी केली आहे. पंतने 398 धावांचा पाऊस पाडलाय. तर संजूने 385 धावा केल्या आहेत. राहुलपेक्षा दोघांचा स्ट्राईक रेटही सरस राहिलाय. निवड समितीने राहुलपेक्षा पंत आणि संजू सॅमसन यांना प्राथमिकता दिली. त्यामुळे केएल राहुलचा पत्ता कट झालाय.
2022 पासून राहुल संघाबाहेर -
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केएल राहुल यानं शानदार कामगिरी केली आहे. त्यानं 72 सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलेय. राहुलने टी20 मध्ये 2265 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतकं आणि 22 अर्धशतकाचा समावेश आहे. 75 वनडे सामन्यात राहुलने 2820 धावा केल्यात. यामध्ये सात शतकं आणि 18 अर्धशतकं ठोकली आहेत. 2022 पासून केएल राहुल भारताच्या टी20 संघाचा सदस्य नाही.