Ind vs NZ T20 Series: आयसीसी टी-20 विश्वचषकानंतर (ICC T20 World Cup 2021) भारत आणि न्यूझीलंड (India Vs New Zealand) यांच्यात टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जाणार आहे. टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीनं या फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडण्याची घोषणा केलीय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा विचार करतंय. ज्यात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहलीचा यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. यामुळे न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत भारताच्या कर्णधारपदाची केएल राहुलच्या खांद्यावर सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. राहुलने आयपीलएलमध्ये पंजाब किंग्जचे कर्णधारपद संभाळलंय.


गेल्या काही महिन्यांत वरिष्ठ खेळाडूंना अजिबात ब्रेक मिळालेला नाहीये. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून तर, टी-20 विश्वचषकापर्यंत भारतीय संघ सतत क्रिकेट खेळतंय. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले की, "वरिष्ठ खेळाडूंना काही दिवस आराम करण्याची गरज आहे. केएल राहुलची टी-20 फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. यामुळे न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत त्याच्याकडे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता आहे.


भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि 2 कसोटी सामने होणार आहेत. येत्या 17, 19 आणि 21 नोव्हेंबरला हे सामने खेळले जाणार आहेत. त्यानंतर 25 नोव्हेंबरपासून पहिला कसोटी सामना होणार आहेत. पहिला सामना कानपूरमध्ये होणार आहे. तर, दुसरा कसोटी सामना 3 डिसेंबरला मुंबईत खेळला जाणार आहे. 


महत्वाचे म्हणजे, भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळल्या जाणाऱ्या मालिकेदरम्यान चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगीही दिली जाऊ शकते. टी-20 विश्वचषकात भारताकडून अतिशय खराब कामगिरी पाहायला मिळाली. विश्वचषकात भारताला पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या संघाकडून पराभव स्वीकारावा लागलाय. ज्यामुळे भारताच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा धुसूर झाल्या आहेत. 


संबंधित बातम्या-