Jay Shah ICC: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) पुढील अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. या पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. येत्या 1 डिसेंबरपासून ते आयसीसीची सूत्रे स्वीकारणार आहेत. 


आयसीसीचे अध्यक्ष बनणारे जय शाह (Jay Shah) सर्वात तरुण भारतीय आहेत. जय शाह वयाच्या 36 व्या वर्षी ही जबाबदारी स्वीकारणार आहेत. जय शाह यांच्याआधी भारतातील इतर दिग्गजांनी हे पद भूषवले होते. महत्त्वाची बाब म्हणजे जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. जय शाह यांना आता बीसीसीआयचे सचिवपद सोडावे लागणार आहे.






 1 डिसेंबरला पदभार होती घेणार-


आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले आहेत. त्यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबरला संपणार आहे. यानंतर जय शाह 1 डिसेंबरला आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारतील. 20 ऑगस्ट रोजी आयसीसीने याबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. ग्रेग  बार्कले हे सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. 2020 पासून ते या पदावर होते.


जय शाह यांच्या आधी चार भारतीय आयसीसीच्या अध्यक्षपदी-


जय शाह यांच्या आधी चार भारतीय आयसीसीचे अध्यक्ष होते. जगमोहन दालमिया 1997 ते 2000 पर्यंत आयसीसीचे अध्यक्ष होते. त्यानंतर 2010 ते 2012 पर्यंत शरद पवार आयसीसीच्या अध्यक्षपदी होते. तर एन श्रीनिवासन 2014-15 मध्ये अध्यक्ष होते. तर शशांक मनोहर यांनी 2015-2020 पर्यंत आयसीसीचे अध्यक्षपद भूषवले होते. 


जय शाह काय म्हणाले?


आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर शाह यांनी क्रिकेटचा जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचा आणि लोकप्रियता वाढवण्याचा मानस व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाल्यामुळे खूप आनंद होत असल्याचे शाह म्हणाले. क्रिकेटला अधिक जागतिक बनवण्यासाठी ते आयसीसी आणि सदस्य देशांसोबत जवळून काम करण्यासाठी वचनबद्ध आहे. मी आयसीसी टीमसोबत आणि सदस्य देशांसोबत मिळून क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी पूर्ण प्रयत्न करेन. आमचे लक्ष्य क्रिकेटचा जास्तीत जास्त प्रसार करणे आणि या खेळाला अधिक लोकप्रियता मिळवून देण्याचे असल्याचं जय शाह यांनी सांगितले. 


2015 साली जय शाह बीसीसीआयमध्ये सामील-


जय शाहने 2009 मध्ये क्रिकेट प्रशासनात एन्ट्री घेतली होती. त्याआधी ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव पद सांभाळत होते. त्यानंतर 2015 साली जय शाह बीसीसीआयमध्ये सहभागी झाले आणि सप्टेंबर 2019 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव झाले.


संबंधित बातमी:


रोहन जेटली घेणार जय शाह यांची जागा?; बीसीसीआयच्या सचिवपदासाठी नाव आघाडीवर, महत्वाची माहिती समोर