BCCI Announces Prize Money Domestic Cricket : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) क्रिकेटपटूंसाठी मोठी घोषणा केली आहे. एका ट्विटमध्ये, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दोन वरिष्ठ पुरुषांच्या स्पर्धांसह सर्व महिला आणि ज्युनियर क्रिकेटमध्ये सामनावीर आणि टूर्नामेंटचा प्लेयर ऑफ द टूर्नामेंट यांना बक्षीस रक्कम दिली जाईल असे सांगितले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळाडूंचा सहभाग वाढवण्यासाठी बीसीसीआयने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.
बीसीसीआयचे सचिव शाह यांनी सोमवार 26 ऑगस्ट रोजी 'एक्स' वर एका पोस्टद्वारे बोर्डाच्या नव्या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की आता बोर्ड देशांतर्गत क्रिकेटमधील महिलांच्या सर्व स्पर्धांमध्ये आणि ज्युनियर क्रिकेटच्या सर्व स्पर्धांमध्ये सामनावीर आणि टूर्नामेंटचा सर्वोत्तम पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार म्हणूनही पैसे देईल.
एवढेच नाही तर सिनियर पुरुष क्रिकेटच्या दोन महत्त्वाच्या स्पर्धा, विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली टी-20 टूर्नामेंटमध्ये अशा पुरस्कारांसह बक्षीस रक्कम दिली जाईल. रणजी ट्रॉफीमध्ये बक्षिसाची रक्कम यापूर्वीच देण्यात आली आहे.
जय शाह यांच्या या निर्णयामुळे देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या कमाईत नक्कीच वाढ होईल आणि अधिकाधिक खेळाडूंना त्यांच्या कामगिरीत आणखी सुधारणा करण्याची प्रेरणा मिळेल. बीसीसीआयच्या सचिवांनीही या निर्णयाचे कारण सांगितले. ते म्हणाले की, या निर्णयामुळे बोर्डाला देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या चांगल्या कामगिरीची ओळख होईल आणि त्यांना बक्षीस पण मिळेल. हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेचे आभार मानले आणि देशातील क्रिकेटपटूंसाठी चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याबद्दलही बोलले.
जय शाह यांच्या कार्यकाळात देशांतर्गत क्रिकेटला चालना देण्यासाठी पावले उचलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर गेल्या 3-4 वर्षात बीसीसीआयने पुरुष संघातील तसेच महिला क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंची कमाई वाढवण्याचे काम केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच बोर्डाने कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या मॅच फीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती.
दोन वर्षांपूर्वी बोर्डाने तिन्ही फॉरमॅटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये महिला खेळाडूंची मॅच फी पुरुष खेळाडूंच्या बरोबरीची करण्याची घोषणाही केली होती. यापूर्वी बोर्डाने रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या खेळाडूंच्या मॅच फीमध्येही जवळपास दुप्पट वाढ केली होती.