Pakistan vs Bangladesh Test Series : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना संपला आहे. बांगलादेशने तो 10 विकेट्सने जिंकला. बांगलादेश संघ सध्या या मालिकेत आघाडीवर असून आता क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानला कसोटी मालिकेत पराभूत करण्यासाठी सज्ज आहे. पण दरम्यान, आयसीसीने पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळले आहे, आणि बांगलादेशच्या विजयाच्या जल्लोषातही थोडाफार विरजण टाकले आहे. आयसीसीने दोन्ही संघांना शिक्षा सुनावली आहे.
स्लोओव्हर रेटमुळे आयसीसीने सुनावली शिक्षा
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिका सामने खेळले जात आहेत. यावर आयसीसी बारीक लक्ष ठेवून आहे. थोडीशीही चूक झाली तर आयसीसी ताबडतोब कारवाई करते. रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत स्लो ओव्हररेटमुळे पाकिस्तानचे 6 गुण व बांगलादेशचे 3 गुण वजा केले आहेत. पाकिस्तान आधीच पराभूत झाला आहे, त्यामुळे तो थेट WTC गुणतालिकेत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर विजयानंतर बांगलादेशने मिळवलेल्या गुणांमधून तीन गुण वजा केले जातील. म्हणजे दोन्ही संघांचे थोडेफार नुकसान झाले आहे.
बांगलादेश संघाने सामन्यात गाजवले वर्चस्व
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तानने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 6 विकेटवर 448 धावा करत डाव घोषित केला. या धावा बांगलादेशसाठी जास्त असतील असे कर्णधार शान मसूदला वाटले असावे. पण बांगलादेशचे फलंदाज वेगळेच विचार करत होते. बांगलादेशने पहिल्या डावात 565 धावा केल्या. यासह बांगलादेशने पहिल्या डावाच्या आधारे आघाडी घेतली. दुसऱ्या डावात पाकिस्तानचा संघ फलंदाजीला आला तेव्हा त्यांचा संपूर्ण संघ 146 धावांवरच मर्यादित होता. बांगलादेशने सामन्याच्या दुसऱ्या डावात कोणतेही नुकसान न करता 30 धावा केल्या आणि सामना दहा गडी राखून जिंकला.
बांगलादेश क्रिकेटसाठी हा अविस्मरणीय दिवस होता. पहिली गोष्ट म्हणजे बांगलादेशने पाकिस्तानला पहिल्यांदाच कसोटीत पराभूत केले होते. यासह पाकिस्तानचा संघ यापूर्वी कधीही घरच्या मैदानावर 10 विकेटने हरला नव्हता. कमकुवत समजल्या जाणाऱ्या बांगलादेशसारख्या संघाने पाकिस्तानला असे काही केले की ज्याचा कदाचित कोणी विचारही केला नसेल. आता पुढच्या सामन्यात पाकिस्तानी संघ कसा पुनरागमन करेल हे पाहणे बाकी आहे, तर बांगलादेश संघ हाच ट्रेंड कायम ठेवू शकेल का हे पाहणे बाकी आहे.
हे ही वाचा :