मुंबई: भारतीय क्रिकेट संघातील प्रमुख खेळाडू आणि टी 20 क्रिकेटमधील भारतीय संघाचा उपकप्तान हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याला आयपीएलमध्ये ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. हार्दिकच्या खासगी जीवनात देखील चढ उतार होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध व्हायच्या. आयपीएलमधील मुंबईची निराशाजनक कामगिरी आणि वैयक्तिक आयुष्यातील वादळं या सर्व गोष्टी घडत असताना हार्दिक पांड्यानं टी 20 वर्ल्ड कप भारताला मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी केली. हार्दिकनं सहा डावांमध्ये 144 धावा केल्या तर 11 विकेट देखील घेतल्या. हार्दिकच्या या कामगिरीवर ईशान किशन (Ishan Kishan) यानं भाष्य केलं आहे. हार्दिकला पाठिंबा देखील किशननं दिला असून ट्रोलर्सला उत्तर देखील दिलं आहे.


रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनपदावरुन हटवण्यात आल्यानंतर ती जबाबदारी हार्दिक पांड्याकडे देण्यात आली होती. तेव्हा पासून हार्दिक पांड्याचं ट्रोलिंग सुरु झालं होतं. हार्दिक पांड्यासाठी अपशब्द वापरण्यात आले, त्याचं हूटिंग देखील करण्यात आलं. आता ईशान किशन हार्दिक पांड्या समर्थनार्थ उतरला असून त्यानं कौतुक देखील केलं आहे. 


 
ईशान किशन म्हटलं की हार्दिकला वर्ल्ड कप ट्रॉफी घेत ड्रेसिंग रूमच्या बाहेर येताना पाहून भावनिक झालो होतो. गेल्या सहा महिन्यांमध्ये हार्दिक पांड्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या. मात्र,हार्दिकनं धैर्य कायम ठेवलं, त्यानं संयम सुटू दिला नाही. वडोदरा येथी ट्रेनिंग असो, किवा आयपीएलमध्ये सोबत असलेल्या ईशान किशननं हार्दिक पांड्याची साथ सोडली नाही. जे सर्व काही सुरु होतं त्याचा त्रास होऊन देखील हार्दिकनं काहीच म्हटलं नाही. तर, त्यानं संयम कायम ठेवत आपलं लक्ष केवळ खेळावर दिलं, असं ईशान किशन म्हटला. 


हार्दिकवर विश्वास होता..


हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या 2024 च्या हंगामात चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र, हार्दिकनं टी 20 वर्ल्ड कपमध्ये फॉर्म पुन्हा मिळवला. हार्दिकच्या अखेरच्या ओव्हरमधील गोलंदाजीनं भारताला विजेतेपद मिळवून दिलं. भारताच्या विश्वचषक विजयात हार्दिक पांड्याचं योगदान देखील महत्त्वाचं होतं.  यासंदर्भात बोलताना ईशान किशन म्हणाला की हार्दिकनं टी 20 वर्ल्ड कपसाठी त्याच्या कामगिरीचं बेस्ट बाकी ठेवलेलं आहे. ईशान किशन पुढं म्हणाला की तो हार्दिक पांड्याचे ते शब्द कधी विसरणार नाही. एकदा चांगली कामगिरी केली की जे आज अपशब्द वापरतात ते टाळ्या वाजवतील, असं हार्दिक पांड्यानं म्हटल्याचं ईशान किशननं सांगितलं. जेव्हा करिअरमध्ये खराब काळातून जात होतो त्यावेळी हार्दिकनं हे शब्द वापरले होते, असं किशन म्हणाला. लोकांना चर्चा करु द्यात आपण आपल्याला सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यावर भर द्यावा, असं हार्दिकनं सांगितल्याचं किशन यानं म्हटलं . 


संबंधित बातम्या :


T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात एकही सामना न खेळता तीन खेळाडूंनी 5 कोटी रुपये कमावले; राहुल द्रविड यांना किती रुपये मिळणार?


Abhishek Sharma : पहिल्या मॅचमध्ये अपयश, लोकांनी संशय घेतला, अभिषेक शर्माच्या शतकानंतर वडिलांनी मन मोकळं केलं...