IPL 2025 Rule Change: बीसीसीआयने काल (20 मार्च) आयपीएल (IPL 2025) कर्णधारांच्या सहमतीनंतर आगामी सत्रात चेंडूवर लाळ किंवा थुंकी लावण्यावरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतला. कोरोना काळानंतर लाळेचा वापर पुन्हा सुरू करणारी आयपीएल ही सर्वात पहिली मोठी स्पर्धा ठरली आहे.
उद्या म्हणजेच 22 मार्चपासून आयपीएल 2025 च्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगणार आहे. मात्र आयपीएलचा थरार सुरु होण्याआधी बीसीसीआयने सर्व 10 संघांच्या कर्णधारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत लाळ किंवा थुंकी लावण्यावरील बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांसारख्या खेळाडूंनी 'इम्पॅक्ट प्लेअर' नियमावर आधीच नाराजी व्यक्त केली आहे. या नियमावर देखील या बैठकीत चर्चा झाली. अधिकाऱ्याने सांगितले की, काही जणांनी 'इम्पॅक्ट प्लेअर' नियमावर आक्षेप घेतला असला तरी त्यामुळे अनकॅप फलंदाज आणि गोलंदाजांना फायदा झाला आहे.
आयपीएलमध्ये आता एका सामन्यात 3 चेंडू वापरता येणार-
क्रिकबझच्या वृत्तानुसार, बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये चेंडूवर लाळेच्या वापराला सूट देण्यात आली आहे. बीसीसीआयने यापूर्वी चेंडूवर लाळ वापरण्यास बंदी घातली होती. यासोबतच आणखी एक मोठा नियम बदलला आहे. सामन्यादरम्यान दुसऱ्या चेंडूबाबत एक नियम बनवण्यात आला आहे. याअंतर्गत, दुसरा चेंडू आयपीएल सामन्याच्या दुसऱ्या डावातील 11 व्या षटकानंतर येईल. रात्रीच्या वेळी दवाचा परिणाम लक्षात घेऊन हा नियम आणण्यात आला आहे. धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला 2 नवीन चेंडूंनी खेळण्याची संधी मिळणार आहे. याआधी दोन्ही डावात खेळाडूंना प्रत्येकी 1-1 चेंडू वापरण्याची अनुमती होती. मात्र आता नवीन नियमानूसार, दुसऱ्या डावातील 11 वे षटक झाल्यानंतर दुसऱ्या नव्या चेंडूंचा वापर केला जाईल.
पाच महागडे खेळाडू कोणते ठरले?
लिलावातील पहिल्या पाच सर्वात महागड्या खेळाडूंवर नजर टाकल्यास ऋषभ पंत पहिल्या क्रमांकावर आहे. श्रेयस अय्यर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्सने त्याला 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले. व्यंकटेश अय्यर हा तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने 23.75 कोटी रुपयांना विकत घेतले. अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल यांनाही पंजाब किंग्सने विकत घेतले. यावेळी अर्शदीप आणि युझवेंद्र चहलला संघात घेण्यासाठी पंजाब किंग्सने 18 कोटी रुपये मोजले.