IPL 2022, Mega Auction : आफ्रिदी-युवराज-अझरुद्दीन आणि शाहरुख, मेगा लिलावात लागणार मोठी बोली
IPL 2022, Mega Auction :आयपीएलच्या रणांगणात यंदा लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या फौजा दाखल झाल्या असून, त्यामुळं आयपीएलच्या आगामी म्हणजे पंधराव्या मोसमापासून दहा फ्रँचाईझी विजेतेपदाच्या शर्यतीत असतील.
IPL 2022, Mega Auction : बीसीसीआयनं आयपीएलच्या मेगा लिलावासाठी 590 देशीविदेशी खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएलच्या रणांगणात यंदा लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या फौजा दाखल झाल्या असून, त्यामुळं आयपीएलच्या आगामी म्हणजे पंधराव्या मोसमापासून दहा फ्रँचाईझी विजेतेपदाच्या शर्यतीत असतील. आणि त्या शर्यतीची स्टार्टिंग लाईन ही आयपीएलचा मेगा लिलाव असणार आहे. हा मेगा लिलाव येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरूत संपन्न होणार आहे. सर्वोत्तम खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामावून घेण्याचा प्रत्येक फ्रँचाईझीचा प्रयत्न असेल. 590 खेळाडूंमध्ये 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडू आहेत. या सर्व खेळाडूंची यादी मंगळवारी जारी करण्यात आली आहे. त्या खेळाडूंची मूळ किंमतही जारी करण्यात आली आहे.
दोन दिवस होणाऱ्या लिलावात अनेक खेळाडू मालामाल होऊ शकतात. बीसीसीआयने जारी केलेल्या यादीत असे काही खेळाडूंची नावे आहेत, जी आधीच जागतिक क्रिकेटशी जोडली गेलेली आहे. कुणाचं नाव आफ्रिदी आहे तर कुणाचं नाव युवराज... सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही पुन्हा एकदा लिलावात उतरला आहे.
अशाच काही खेळाडूंची नावे पाहूयात...
• मोहम्मद आफ्रिदी- अष्टपैलू (भारत) – मूळ किंमत 20 लाख
• ईशान आफ्रिदी - अष्टपैलू (भारत) – मूळ किंमत 20 लाख
• जाँटी सिद्धू- अष्टपैलू (भारत) – मूळ किंमत 20 लाख
• युवराज चौधरी- अष्टपैलू (भारत) – मूळ किंमत 20 लाख
• लखन राजा - अष्टपैलू (भारत) – मूळ किंमत 20 लाख
• अर्जुन तेंडुलकर- अष्टपैलू (भारत) – मूळ किंमत 20 लाख
• चिंतल गांधी- गोलंदाज (भारत) – मूळ किंमत 20 लाख
• मोहम्मद अझरुद्दीन- यष्टीरक्षक (भारत) – मूळ किंमत 20 लाख
• शाहरुख खान- अष्टपैलू (भारत) – मूळ किंमत 40 लाख
आयपीएलच्या या मेगा लिलावात भारताच्या श्रेयस अय्यर, शिखर धवन, रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ईशान किशन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, ईशांत शर्मा, उमेश यादव या शिलेदारांना चढ्या भावात विकत घेण्यासाठी फ्रँचाईझींमध्ये चुरस पाहायला मिळाले. परदेशी आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये फाफ ड्यू प्लेसी, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, कागिसो रबाडा, ट्रेण्ट बोल्ट, क्विन्टन डी कॉक, जॉनी बेअरस्टो, जेसन होल्डर, ड्वेन ब्राव्हो, शाकिब अल हसन आणि वानिन्दू हसरंगा या नावांवर दौलतजादा होण्याची चिन्हं आहेत. तसंच देवदत्त पडिक्कल, हर्षल पटेल, कृणाल पंड्या, शाहरुख खान, दीपक हुडा, आवेश खान, यश धुल, विकी ओस्तवाल, राजवर्धन हंगरगेकर, रवीकुमार, अंगक्रिश रघुवंशी या उदयोन्मुख खेळाडूंना विकत घेण्यासाठीही फ्रँचाईझी उत्सुक असतील.