Indian Premier League 2022: कोरोना महामारीमुळं अर्ध्यात स्थगित झालेल्या आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळवण्यात आला होता. या हंगामातील अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं कोलकाता नाईट राईडर्सला पराभूत करून चौथ्यादा आयपीएलचं जेतेपद जिंकलंय. यातच आयपीएल 2022 बाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांनी महत्वाची माहिती दिलीय. आयपीएलचा पुढील हंगाम भारतातच खेळला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. महत्वाचं म्हणजे, आयपीएलच्या पुढील हंगामात एकूण दहा संघ मैदानात उतरणार आहेत. तर, चेन्नईच्या मैदानात अंतिम सामना खेळला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


चेन्नई येथील एका कार्यक्रमात जय शाह यांनी म्हटलं की, चेपॉकच्या मैदानावर सीएसकेचा खेळ पाहण्यासाठी चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. तो क्षण फार दूर नाही आणि आयपीएलचा 15 वा हंगाम भारतात होणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आणखी दोन नवे संघ सामील झाले आहेत. ज्यामुळे आयपीएल 2022 आणखी रोमांचक होण्याची अपेक्षा आहे, असंही जय शाह यांनी म्हटलंय. आयपीएल 2022 मध्ये एकूण 74 सामने खेळले जाणार आहेत. या हंगामात प्रत्येक संघाचे 16 सामने होणार आहेत.


गेल्या महिन्यात, आरपीएसजी ग्रुप आणि सीव्हीसी कॅपिटलनं दोन नवीन आयपीएल फ्रँचायझींचे मालकी हक्क विकत घेतले. आरपीएसजी ग्रुपने लखनौस्थित फ्रँचायझी 7,090 कोटी रुपयांना विकत घेतली. तर, सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबाद फ्रँचायझी 5,166 कोटी रुपयांना विकत घेतली. 2011 नंतर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा 10 संघ लीगमध्ये खेळताना दिसतील.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha