AInd vs NZ, 3rd T20, Eden Gardens: न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-20 मालिकेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतानं 73 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं 3-0 फरकानं मालिका जिंकलीय. या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करीत न्यूझीलंडसमोर विजयासाठी 185 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे फलंदाज 17.2 षटकात 111 धावांवर ढेपाळले. या सामन्यात भारताचा टी-20 संघाचा कर्णधार रोहित शर्मानं आपण जगातील इतर फलंदाजांपेक्षा वेगळे कसे आहोत? हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय. रोहित शर्माच्या बॅटमधून जेव्हा धावा बरसायला लागतात, तेव्हा भल्याभल्या गोलंदाजांची कशी दमछाक होते? याचा अनुभव ईडन गार्डनवर उपस्थित असलेल्या क्रिकेटरसिकांनी घेतलाय.


या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून केएल राहुलच्या जागेवर संधी मिळालेल्या ईशान किशन आणि रोहित शर्मानं संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी 69 धावांची भागीदारी केली. परंतु, सातव्या षटकात मिचेल सॅंटनरच्या गोलंदाजीवर ईशान किशन बाद झाला. त्यानं सहा चौकारांसह 21 चेंडूत 29 धावा केल्या. त्यानंतर मैदानात आलेल्या सुर्यकुमार यादवलाही सँटनरनं शून्यावर माघारी धाडलं. या सामन्यात ऋषभ पंतही चार धावा करून स्वस्तात परतला. त्यानं सॅंटनरच्या गोलंदाजीवर मार्टिल गप्टिलला झेल दिला. दरम्यान, आक्रमक फलंदाजी करणारा रोहित शर्मा आज मोठी खेळी करेल, अशी अपेक्षा केली जात असताना फिरकीपटू ईश सोडनं त्याला बाद केलं. रोहितनं पाच चौकार आणि 3 षटकारांच्या जोरावर 31 चेंडूत 56 धावा केल्या. त्यानंतर श्रेयस अय्यरनं 20 चेंडूत 25 आणि व्यंकटेश अय्यरनं 15 चेंडूत 20 धावा करून संघाचा डाव सावरला. हे दोघेही बाद झाल्यानंतर हर्षल पटेल आणि दिपक चहरनंही फटकेबाजी केली. हर्षलनं 11 चेंडूत 18 धावा केल्या. तर, दीपक चहरनं 8 चेंडूत 21 धावा ठोकल्या. ज्यामुळं भारतानं 20 षटकात 7 गडी गमावून 184 धावा केल्या. न्यूझीलंडच्या संघाकडून सँटनरने सर्वाधिक तीन गडी बाद केले. तर, ट्रेन्ट बोल्ट, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन आणि ईश सोडी यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.


भारतानं दिलेल्य लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंडचा संघ भारतीय गोलंदाजीसमोर डगमगताना दिसला. न्यूझीलंडच्या संघानं पावरप्लेमध्ये डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन आणि ग्लेन फिलिप्स यांच्या रुपात तीन गडी गमावले. मात्र, या सामन्यातही सलामीवीर मार्टिन गप्टिलनं चांगली फलंदाजी केली. त्यानं 36 चेंडूत 51 धावांची खेळी केली. यात चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. परंतु, भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलनं 11 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर गप्टिलला झेलबाद केलं. गप्टिल बाद झाल्यानंतर न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला डाव सावरता आला नाही. न्यझीलंडचा संपूर्ण संघ 17.3 षटकात तंबूत परतला. यामुळं भारताला 73 धावांनी विजय मिळवता आला. या विजयासह भारतानं टी-20 मालिका जिंकलीय. तर, रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं जिंकलेली पहिली टी-20 मालिका आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha