Unmukt Chand Marriage : भारताला आपल्या नेतृत्वात अंडर-19 विश्वचषक जिंकून देणारा फलंदाज उन्मुक्त चंद विवाहबंधनात अडकला आहे. फिटनेस आणि न्यूट्रीशन न्यूट्रीशन कोच सीमरन खोसला हिच्यासोबत उन्मुक्त चंदने लगीनगाठ बांधली. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत उन्मुक्त चंद याने आपल्या चाहत्यांना माहिती दिली. उन्मुक्त चंद आणि सीमरन खोसला गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. रविवारी अखेर या दोघांनी लगीनगाठ बांधली. उन्मुक्त चंद आणि सीमरन खोसला यांच्या लग्नाला फक्त मोजक्याच लोकांची उपस्थिती होती.


कोण आहे सीमरन खोसला?


उन्मुक्त चंदला क्लीन बोल्ड करणारी सीमरन खोसला व्यवसायाने फिटनेस आणि न्यूट्रीशन कोच आहे. सिमरन खोसला यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरून त्यांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. आज आपण कायमचे एक होण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी एका छायाचित्रात लिहिले आहे. 




28 व्या वर्षी भारतीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती -


क्रिकेटपटू उन्मुक्त चंद याने याचं वर्षी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. उन्मुक्तनं भारताला 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकून दिला होता. 2012 साली झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक संघाचा कर्णधार होता आणि अंतिम सामन्यात 111 धावांची नाबाद खेळी केली होती. स्थानिक क्रिकेटमध्ये उन्मुक्त दिल्ली आणि उत्तराखंड या संघांकडून देखील खेळला असून त्याचं प्रदर्शन चांगलं राहिलं आहे. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. मात्र त्याला तिथं म्हणावं असं यश मिळालं नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 120 सामन्यात दमदार फलंदाजी करत उन्मुक्तने 41.33 च्या सरासरीने 4505 धावा केल्या आहेत. यात सात शतक आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे. 


बिग बॅश लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय - 
भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर उन्मुक्तने अमेरिकेत खेळण्याचा निर्णय घेतलाय. उन्मुक्त सध्या अमेरिकन क्रिकेट लीगमध्ये सिलिकॉन वॅली स्ट्राइकर्ससोबत खेळत आहे. काही दिवसांपूर्वीच उन्मुक्तने ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतलाय. या लीगमध्ये उन्मुक्त मेलबर्न रेनेगेड्स या संघाकडून खेळणार आहे. बिग बॅश लीगमध्ये खेळणारा उन्मुक्त पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरलाय.