IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दमदार प्रदर्शन करून गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) संघानं पदार्पणाच्या हंगामातच ट्रॉफी जिंकली. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली गुजरातनं राजस्थान रॉयल्सचा अंतिम सामन्यात सात विकेट्सनं पराभव केला. या हंगामात बलाढ्य संघ आणि दिग्गज खेळाडूंनी अत्यंत खराब कामगिरी करून दाखवली. तर, काही युवा खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या हंगामात काही असे खेळाडू आहेत, ज्यांची मूळ किंमत 20 लाख होती. परंतु, त्यांनी दमदार कामगिरी क्रिडाविश्वावर आपली छाप सोडली. 


पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि चार वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलेल्या चेन्नई सुपर किंग्जला यंदाच्या हंगामात प्ले ऑफमध्ये पोहोचता आलं नाही. तर, विराट कोहली, रोहित शर्मा, एमएस धोनी, ग्लेन मॅक्सवेल या दिग्गज खेळाडूंची कामगिरी अतिशय निराशाजनक ठरली. परंतु, मुकेश चौधरी, आयुष बदोनी, मोहसिन खानसारख्या युवा फलंदाजांनी सर्वांना प्रभावित केलंय. 


मुकेश चौधरी
चेन्नईच्या संघात नेट गोलंदाज म्हणून सामील झालेल्या मुकेश चौधरीला चेन्नई संघानं आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये 20 लाख रुपयांना खरेदी केलं. या हंगामात चेन्नईच्या संघानं 14 पैकी फक्त चार सामने जिंकले. पण मुकेशनं चांगली गोलंदाजी करत आपली छाप सोडली. ज्यामुळं चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं त्याचं कौतूकही केलं होतं. मुकेशनं यंदाच्या हंगामात 13 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 16 विकेट्स घेतले. यंदाच्या हंगामात ब्राव्होनंतर चेन्नईकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा तो एकमेक गोलंदाज आहे. 


आयुष बदोनी
लखनौ सुपर जायंट्सनं स्टार फलंदाज आयुष बदोनीला 20 लाख रुपयांना विकत घेतलं. जे खूप फायदेशीर ठरलं. बदोनीनं गुजरात संघाविरुद्ध 41 चेंडूत 54 धावांची जलद खेळी केली. याशिवाय सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना आयुषनं 9 चेंडूत 19 आणि 3 चेंडूत 10 धावा केल्या आहेत. आयुषनं पदार्पणाच्या हंगामात 13 सामने खेळले आणि 161 धावा केल्या.


मोहसीन खान
लखनौ संघानं वेगवान गोलंदाज मोहसीन खानला त्याची मूळ किंमत 20 लाखात विकत घेतलं होतं. मोहसीनचा हा पदार्पणाचा हंगाम होता, ज्यामध्ये त्यानं 9 सामने खेळले आणि संघासाठी सर्वाधिक 14 विकेट्स घेतल्या. लखनौ संघानं भेदक गोलंदाजी करून प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं. 


साई सुदर्शन
पहिल्याच सत्रात चॅम्पियन ठरलेल्या गुजरात संघानं आघाडीचा फलंदाज साई सुदर्शनवर 20 लाख रुपये खर्च केले. सुदर्शननं पदार्पणाच्या हंगामात क्रिकेटविश्वावर आपला ठसा उमटवला. त्यानं केवळ 5 सामने खेळले, ज्यात त्यानं 145 धावा केल्या. त्यानें पंजाब किंग्जविरुद्ध नाबाद 65 धावांची खेळी केली.


जितेश शर्मा
मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जनं यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माला मेगा ऑक्शमध्ये 20 लाख रुपयांना विकत घेतलं. जितेशचा हा पदार्पणाचा हंगाम होता. या हंगामात त्यानं चांगली कामगिरी करत चाहत्यांसह दिग्गज खेळाडूंना प्रभावित केलं. जितेशनं 12 सामन्यात 234 धावा केल्या. त्यानं 44 धावांची सर्वोत्तम खेळी केली.


हे देखील वाचा-