Inter Club Women's Cricket League : मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे (Mumbai Cricket Association) जागतिक महिला दिनानिमित्त (International Women's Day) यंदा प्रथमच आंतर क्लब महिला क्रिकेट लीगचं (Womens Cricket League) आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेटला सध्या प्राप्त होत असलेलं ग्लॅमर आणि बीबीसीआयने (BCCI) नुकतंच सुरु केलेलं महिला आयपीएल, यामुळे ही महिला क्रिकेट लीग तरुण खेळाडूंसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म ठरु शकते.
या लीगमध्ये 52 क्लब सहभागी झाले असून 780 महिला खेळाडूंना या स्पर्धेमधून क्रिकेटचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लब विरुद्ध फोर्ट यंगस्टर्स यामधील उद्घाटनीय सामन्यातून मुंबईच्या क्रॉस मैदानातून या लीगला सुरुवात झाली. बीसीसीआयच्या सदस्या सुलक्षणा नाईक (Sulakshana Naik) या सामन्याला उपस्थित आहेत.
प्रत्येक गटातील सामने चुरशीचे होणार!
एमसीए महिला क्रिकेट लीगमध्ये 52 महिला संघ 13 गटवारीमध्ये साखळी सामन्यांसाठी विभागले गेले आहेत. साखळी सामन्यांमधून गट-विजेता एकच संघ बाद फेरीत प्रवेश करणार असल्यामुळे प्रत्येक गटामधील सामने चुरशीचे होतील. मुंबईतील ऐतिहासिक अशा कांगा साखळी स्पर्धेने जसे भारताला अनेक दिग्गज क्रिकेटपटू दिले तशाच अनेक महिला क्रिकेट खेळाडू मुंबईला आणि पर्यायाने भारताला मिळावेत या हेतूने ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आली आहे.
आज खेळवले जाणारे जाणारे सामने!
नवरोज क्रिकेट क्लब वि. पी.जे. हिंदू जिमखाना, स्पोर्ट्स प्रमोशन ग्रुप मुंबई वि. पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन, आवर्स क्रिकेट क्लब वि. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन, नॅशनल क्रिकेट क्लब वि. स्पोर्टिंग युनियन क्लब, राजावाडी क्रिकेट क्लब वि. प्रभू जॉली यंग क्रिकेटर्स, पय्याडे स्पोर्ट्स क्लब वि. माटुंगा जिमखाना, स्पोर्टिंग क्लब कमिटी ठाणे वि. दादर पारसी कॉलनी स्पोर्टिंग क्लब, ग्लोरिअस क्रिकेट क्लब वि. डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी, एम.आय.जी. क्रिकेट क्लब वि. वरळी स्पोर्ट्स क्लब, मुंबई पोलीस जिमखाना वि. जे. भाटीया स्पोर्ट्स क्लब इत्यादी लढती आज मुंबईतील 13 क्रिकेट खेळपट्ट्यांवर खेळवल्या जाणार आहेत.
विनामूल्य पाहता येणार गुजरात जायंट्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु WPL सामना
आंतरराष्ट्रीय महिला दिन 2023 च्या निमित्ताने, महिला प्रीमियर लीगच्या आयोजकांनी सर्व क्रीडाप्रेमींना खास भेट दिली आहे. 8 मार्च रोजी म्हणजेच आज ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) होणाऱ्या गुजरात जायंट्स (Gujarat Giants vs Royal Challengers Bangalore) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात सर्वांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. वुमन्स प्रीमियर लीगच्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.