India Vs Australia Indore Pitch: टीम इंडिया (Team India) सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) खेळल्या जात असलेल्या 4 सामन्यांच्या घरच्या कसोटी मालिकेत 2-1 नं आघाडीवर आहे. या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना 9 मार्चपासून अहमदाबादमध्ये (Ahmedabad) खेळवला जाणार आहे. तिसरा सामना इंदूरमध्ये (Indore Test) खेळला गेला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघानं 9 विकेट्सनी विजय मिळवला. तर त्यापूर्वी झालेल्या दोन कसोटी सामन्यांत टीम इंडियानं विजय मिळवला होता. 


इंदूर कसोटी सामन्याचा निकाल तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच लागला. म्हणजेच, अडीच दिवसही पूर्ण होऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमच्या (Holkar Cricket Stadium) खेळपट्टीवर जोरदार टीका झाली. यासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) खेळपट्टीला 'खराब' (Poor) रेटिंग देताना 3 डिमेरिट पॉइंट्सही दिले आहेत.  


आता या खराब खेळपट्टीवरून मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन (MPCA) आणि भारतीय बोर्ड यांच्यात वाद सुरू आहे. एमपीसीएनं खराब खेळपट्टीचा संपूर्ण दोष बीसीसीआयवरच टाकला आहे. दुसरीकडे, बीसीसीआयनंही त्याच्या कृतीविरोधात आयसीसीमध्ये अपील करण्याचं म्हटलं आहे. अशा परिस्थितीत हे प्रकरण आता चांगलंच तापलं आहे.






इंदूरची खेळपट्टी बनवण्यात बीसीसीआयचा पूर्ण हात 


एमपीसीएचे अध्यक्ष अभिलाष खांडेकर यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितलं की, "बीसीसीआयचे दोन पिच क्युरेटर सामन्याच्या 8-10 दिवस आधी इंदूरला आलं होतं. त्यांच्या विशेष देखरेखीखाली ही खेळपट्टी तयार करण्यात आली. ही खेळपट्टी बनवण्यात एमपीसीएची कोणतीही भूमिका नाही.


ते म्हणाला, "मला हे स्पष्ट करायचं आहे की, इतर स्टेट असोसिएशनप्रमाणेच, MPCA ची आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी खेळपट्टी बनवण्यात कोणतीही भूमिका नाही. पीच क्युरेटर बीसीसीआयकडून येतात आणि त्यांना भारतीय संघ व्यवस्थापन तसेच भारतीय बोर्डाकडून खेळपट्टी तयार करण्याच्या सूचना मिळतात. यापूर्वी नागपूर आणि दिल्ली कसोटी सामनेही तीन दिवसांत संपले होते. याशिवाय दोन्ही संघांच्या कर्णधारांनीही सामन्यानंतर इंदूरच्या खेळपट्टीला पाठिंबा दिला आहे."


बीसीसीआय आयसीसीच्या निर्णयाला आव्हान देणार 


दुसरीकडे इंडियन एक्सप्रेसनं आपल्या वृत्तात म्हटलंय की, बीसीसीआय आता आपल्या निर्णयाला आयसीसीमध्ये आव्हान देणार आहे. बीसीसीआयनं पूर्ण तयारी केली आहे. अहवालानुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आम्ही परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच या प्रकरणी निर्णय घेऊ.


आयसीसीच्या नियमांनुसार, बीसीसीआयकडे अपील करण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी आहे. तसेच, जर एखाद्या स्टेडियमला ​​पाच वर्षांच्या रोलिंग वेळेत 5 किंवा त्याहून अधिक डिमेरिट पॉइंट्स मिळाले, तर त्या स्टेडियमवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. म्हणजे, त्या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामने होऊ शकत नाहीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IND vs AUS: अहमदाबादमध्ये टीम इंडियाची 'कसोटी'; WTC फायनल गाठण्यासाठी चौथा सामना जिंकावाच लागणार