Indore Stadium Pitch Rating: BCCI च्या आवाहनानंतर ICC चा मोठा निर्णय; इंदूरच्या खेळपट्टीची रेटिंग बदलली
India vs Australia Indore Test Pitch: इंदूर कसोटी सामन्यानंतर इंदूरच्या खेळपट्टीवरुन गदारोळ झाला होता. अखेर ICC नं इंदूरच्या खेळपट्टीची रेटिंग बदलली आहे.
India vs Australia Indore Test Pitch: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळपट्टीवरून बराच गदारोळ झाला होता. नागपूर, दिल्ली आणि इंदूर येथे झालेले पहिले तिन्ही कसोटी सामने तीन दिवसांतच संपले. पण कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळपट्टीवरुन विशेष चर्चेत राहिली ती इंदूर कसोटी. इंदूर येथील टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात टीम इंडियाचा नऊ विकेट्सनी पराभव झाला. या सामन्यानंतर इंदूरच्या खेळपट्टीबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अवघ्या दोन दिवसांत 31 विकेट पडल्यामुळे आयसीसीकडून देखील या मैदानाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या मैदानाला आयसीसी मॅच रेफरीकडून सरासरीपेक्षा कमी रेटिंग मिळालं होतं. याच्याविरोधात बीसीसीआयनं आयसीसीकडे दाद मागितली होती. याच प्रकरणी आता मोठा निर्णय घेत ICCनं आपलं रेटिंग बदललं आहे.
आता इंदूर खेळपट्टीला फक्त एक डिमेरिट पॉइंट
इंदूर कसोटी सामन्याचा निकाल तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच लागला होता. म्हणजेच, कसोटी सामन्याचे अडीच दिवसही पूर्ण होऊ शकले नव्हते. अशा परिस्थितीत इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमच्या (Holkar Cricket Stadium) खेळपट्टीवर जोरदार टीका झाली. यासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) खेळपट्टीला 'खराब' (Poor) रेटिंग देताना 3 डिमेरिट पॉइंट्सही दिले होते.
आयसीसीच्या कठोर निर्णयावर बीसीसीआयनं नाराजी व्यक्त केली होती. तसेच, इंदूरच्या खेळपट्टीचं रेटिंग बदलण्याचं आवाहनही केलं होतं. बीसीसीआयच्या आवाहनानंतर आयसीसीनं इंदूरच्या खेळपट्टीचं रेटिंग बदललं. आता ICC नं इंदूरच्या खेळपट्टीचं रेटिंग सरासरीपेक्षा (Below Average) कमी केलं आहे. आता इंदूरच्या खेळपट्टीला फक्त एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.
आयसीसीनं आपल्या निवेदनात म्हटलंय की, "कसोटी सामन्याच्या फुटेजचं आयसीसी अपील पॅनेलनं पुन्हा समीक्षा केली. ज्यात वसीम खान आणि रॉजर हार्पर यांचा समावेश होता. पॅनेलनं असा निष्कर्ष काढलाय की, खेळपट्टीला 'सरासरीपेक्षा कमी' रेटिंग केलं जावं, म्हणजेच होळकर स्टेडियमला मूळ तीन ऐवजी फक्त एक डिमेरिट पॉइंट मिळेल."
इंदूरमधील तिसऱ्या कसोटीत वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवर फिरकीपटूंचं वर्चस्व होतं आणि पहिल्या दिवशी एकूण 14 विकेट्स पडल्या. संपूर्ण सामन्यात फिरकीपटूंनी 31 पैकी 26 विकेट्स घेतल्या. ती कसोटी दोन दिवस आणि एक सत्र चालली, ज्यात ऑस्ट्रेलियन संघ नऊ विकेट्सनी जिंकला. इंदूर कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियानं WTC फायनलमध्ये आपलं स्थान पक्कं केलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी टीम इंडियानंही फायनलमध्ये प्रवेश केला.
खेळपट्टीच्या मानांकनाबाबत आयसीसीचा 'हा' नियम
आयसीसीच्या नियमांनुसार, जर एखाद्या मैदानाच्या खेळपट्टीला पाच वर्षांच्या कालावधीत पाच किंवा त्याहून अधिक डिमेरिट पॉइंट मिळतात, तर त्याला एका वर्षासाठी आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यास मनाई आहे. आता आयसीसीच्या निर्णयामुळे भारतीय चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयसीसीनं खेळपट्ट्यांचं मूल्यांकन एकूण सहा श्रेणींमध्ये विभागलं आहे. त्यात खूप चांगलं (Very Good), चांगलं (Good), सरासरी (Average), सरासरीपेक्षा कमी (Below Average), गरीब (Poor) आणि अनफिट (Unfit) यांचा समावेश आहे.