ICC Test Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काल कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत फारसे बदल झाले नसून यामध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम असल्याचं दिसून येत आहे. भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याने कसोटी क्रमवारीत गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे. तर कसोटीमध्ये अष्टपैलूंच्या यादीत रवींद्र जडेजा प्रथम क्रमांकावर आणि रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी केलेल्या वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरने दोन स्थानांनी प्रगती करत पाचवे स्थान पटकावले. तर भारताचा अक्षर पटेलची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. रवींद्र जडेजा 444 गुणांसह, तर रविचंद्रन अश्विन 322 गुणांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहे.






फलंदाजीत जो रुट अव्वल क्रमांकावर-


फलंदाजी क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. इंग्लंडचा जो रुट (872) अव्वल स्थानी आहे. अव्वल दहामध्ये तीन भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. कर्णधार रोहित शर्मा (751) सहाव्या स्थानी असून, यशस्वी जैस्वाल (740) आठव्या, तर विराट कोहली (737) दहाव्या स्थानी आहे. सलामीवीर शुभमन गिलने एका स्थानाने प्रगती करत 18वे स्थान पटकावले.


वन-डेत काय स्थिती?


भारताच्या दिग्गज खेळाडूंनी वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत आपले स्थान कायम राखले आहे. टॉप 5 मध्ये तीन फलंदाज टीम इंडियाचे आहेत. आयसीसीने वनडेची नवी क्रमवारी जाहीर केली आहे. त्यात पाकिस्तानचा बाबर आझम अजूनही पहिल्या क्रमांक स्थानवर आहे. बाबरने गेल्या आठ महिन्यांपासून एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही, तरीही तो पहिल्या क्रमांकावर कायम आहे. मात्र यानंतर भारतीय खेळाडूंनी सलग तीन स्थानांवर कब्जा केला आहे.


रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर-


भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा 765 गुणांसह आयसीसी वनडे क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. बाबर आझमला मागे टाकण्यासाठी रोहित शर्माला वनडेत आणखी काही मोठ्या खेळी खेळाव्या लागतील. यानंतर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर आहे. माजी कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर कायम आहे. 


संबंधित बातमी:


IPL 2025: मुंबई इंडियन्स रोहित शर्मासह 4 खेळाडूंना डच्चू देणार?; आयपीएलच्या मेगा ऑक्शनआधी मोठी अपडेट


ऑलिम्पिकआधी मोडकळीस आलेले घर अन् 80 लाखांची संपत्ती; सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता अर्शद नदीमने नीरज चोप्रालाही टाकलं मागे!