कोलंबो: श्रीलंकेत महिला आशिया कप (Women Asia Cup 2024) स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारत पाकिस्तानसह एकूण आठ संघ सहभागी झाले आहेत. भारत आणि नेपाळ (INDW vs NEPW) यांच्यात आशिया कपमधील सामना पार पडला. या मॅचवर भारतानं एकहाती वर्चस्व ठेवलं. भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 178 धावा केल्या होत्या. तर, नेपाळचा संघ 20 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 96 धावा केल्या. भारतानं नेपाळवर 82 धावांनी दणदणीत विजय मिळवला. आजच्या पराभवामुळं नेपाळचं स्पर्धेतील आव्हान संपलं. नेपाळच्या पराभवामुळं पाकिस्तानचा उपांत्य फेरीतील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.
भारतानं नेपाळ विरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना 3 विकेटवर 178 धावा केल्या होत्या. नेपाळला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 179 धावांची गरज होती. मात्र, नेपाळच्या डावाची सुरुवात समाधानकारक झाली नाही. नेपाळनं 21 धावांमध्येच दोन विकेट गमावल्या. कॅप्टन इंदू बर्मा आणि सीता मगर यांनी 22 धावांची भागिदारी केली. मात्र, पुढच्या 6 बॉलमध्ये दोघी बाद झाल्या. इंदू बर्मानं 14 तर सीता मगरंन 18 धावा केल्या. यावेळी नेपाळची स्थिती 4 विकेटवर 52 धावा अशी होती.यानंतर पुढील 40 धावांमध्ये नेपाळनं आणखी चार विकेट गमावल्या. नेपाळच्या 7 फलंदाजांना 10 धावा देखील करता आल्या नाहीत.
भारताच्या गोलंदाजांचा प्रभावी मारा
टीम इंडियाला पहिलं यश अरुंधती रेड्डीनं मिळवून दिलं. डावाच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये समझाना खडका हिला तिनं 7 धावांवर बाद केलं. दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी नेपाळला मोठे धक्के दिले.दीप्ती शर्मा हिनं 10 धावा देत 3 विकेट घेतल्या. राधा यादव आणि अरुंधती रेड्डी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. रेणुका सिंहनं एक विकेट घेतली.
भारत आणि पाकिस्तान सेमी फायनलमध्ये
भारतानं महिला आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलेला आहे. भारतानं ग्रुप स्टेजमधील तिन्ही सामने मोठ्या फरकानं जिंकले. तर, भारतानं नेपाळला पराभूत केल्यानं पाकिस्तानचा देखील उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला. बी ग्रुपमधील पहिल्या दोन स्थानावरील संघ निश्चित न झाल्यानं उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान विरुद्ध कोण लढणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
संबंधित बातम्या :
Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदकं कुणाच्या नावावर, टॉप 5 मध्ये 'या' देशांचा समावेश