India vs Sri lanka: सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात (Ind vs SL) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने झाले असून तिसरा सामना उद्या (07 ऑगस्ट) होणार आहे. मात्र तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मासह श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदर खरेदी करताना दिसले. 


सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासह कोचिंग स्टाफचा भाग असलेला अभिषेक नायर देखील दिसत आहे. हा व्हिडीओ श्रीलंकेतील एका मॉलमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये तिन्ही भारतीय खेळाडू एक्सलेटरवरून खाली उतरताना दिसत आहेत.






रोहित शर्मा आतापर्यंत चांगल्या फॉर्ममध्ये-


भारत-श्रीलंका वनडे मालिकेतील दोन सामने खेळले गेले आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्मा दोन्ही सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. टाय झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माने 47 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधाराने 58 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 64 धावा केल्या.


मालिकेत श्रीलंकेची आघाडी-


या मालिकेतील दोन सामने पूर्ण झाल्यानंतर श्रीलंका मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. पहिला एकदिवसीय सामना बरोबरीत संपला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. अशाप्रकारे श्रीलंकेने दोन सामन्यांनंतर मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.


आशिष नेहराने उपस्थित केले प्रश्न-


आता भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर तोंडसुख घेतले आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची रणनीती योग्य नसल्याचे आशिष नेहराचे मत आहे. या मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूंना खेळवायला हवे होते, असं मत आशिष नेहराने व्यक्त केलं आहे. मला माहित आहे की गौतम गंभीर हा प्रशिक्षक म्हणून नवीन आहे, त्याला अनुभवी खेळाडूंसोबत थोडा वेळ घालवायचा आहे. पण या मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती द्यायला हवी होती, असे मला वाटते. या दोन खेळाडूंच्या जागी अन्य खेळाडूंवर प्रयत्न करता आले असते. आशिष नेहरा पुढे म्हणतो की, गौतम गंभीर हा परदेशी प्रशिक्षक नाही, ज्याला रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासोबत परिपूर्ण समन्वय निर्माण करायचा आहे. या दोन ज्येष्ठ खेळाडूंच्या जागी युवा खेळाडूंना संधी मिळायला हवी होती, असं आशिष नेहरा म्हणाला. 


संबंधित बातमी:


भारताची निशा दहिया हात तुटल्यानंतरही लढली; हरल्यानंतर ढसाढसा रडली, पॅरिस ऑलिम्पिकमधील भयानक दृश्य