India vs Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारताला 32 धावांनी पराभव (Ind vs SL) स्वीकारावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या रणनीतीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर (Gautam Gambhir) तोंडसुख घेतले आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची रणनीती योग्य नसल्याचं आशिष नेहराने म्हटलं आहे. या मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूंना खेळवायला हवे होते, असं मत आशिष नेहराने व्यक्त केलं आहे.


आशिष नेहरा काय म्हणाला?


मला माहित आहे की गौतम गंभीर हा प्रशिक्षक म्हणून नवीन आहे, त्याला अनुभवी खेळाडूंसोबत थोडा वेळ घालवायचा आहे. पण या मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती द्यायला हवी होती, असे मला वाटते. या दोन खेळाडूंच्या जागी अन्य खेळाडूंवर प्रयत्न करता आले असते. आशिष नेहरा पुढे म्हणतो की, गौतम गंभीर हा परदेशी प्रशिक्षक नाही, ज्याला रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासोबत परिपूर्ण समन्वय निर्माण करायचा आहे. या दोन ज्येष्ठ खेळाडूंच्या जागी युवा खेळाडूंना संधी मिळायला हवी होती.


टीम इंडियाचा पराभव-


खरंतर या मालिकेत रोहित शर्माने चांगली कामगिरी केली असली तरी विराट कोहली मात्र संघर्ष करताना दिसत आहे. या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने 47 चेंडूत 58 धावांची चांगली खेळी खेळली, मात्र विराट कोहलीने 32 चेंडूत 24 धावा केल्यानंतरही तो कायम राहिला. यानंतर दुसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्माने 44 चेंडूत 64 धावा केल्या, मात्र विराट कोहली 19 चेंडूत 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये गेला. या मालिकेतील पहिला वनडे सामना बरोबरीत सुटला होता. पण दुसऱ्या वनडेत श्रीलंकेने टीम इंडियाचा 32 धावांनी पराभव केला.


पराभवानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?


रोहित शर्मा या पराभवाबाबत बोलताना म्हणाला की जेव्हा तुम्ही मॅचमध्ये पराभूत होता तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट दु:खी करत असते. फक्त 10 ओव्हरची गोष्ट नसते, जेव्हा तुम्हाला मॅच जिंकायची असते तेव्हा सातत्य राखायला लागतं.आम्ही सातत्य राखण्यात अपयशी ठरलो, थोडा निराश झालो आहे, मात्र असं होतं असतं, तुमच्या समोर जे आहे ते बदलायचं असतं. आम्हाला वाटलं डाव्या उजव्या फलंदाजाची जोडी फायदेशीर ठरेल. मात्र वेंडरसेनं चांगली कामगिरी केली, त्यानं सहा विकेट घेतल्या, असं रोहित म्हणाला. आक्रमक फलंदाजी केल्यामुळं 64 धावा केल्या, मी माझं धोरण बदलणार नसल्याचं देखील तो म्हणाला. आम्हाला या खेळपट्टीची माहिती आहे, मधल्या षटकात खेळणं अवघड होऊन जातं. त्यामुळं पॉवरप्लेमध्ये अधिक धावा करण्याचा प्रयत्न केला, असं रोहित शर्माने सांगितले.


भारताला तिसऱ्या सामन्यात विजयाची गरज


श्रीलंकेनं पहिल्या सामन्यात भारताला विजयापासून रोखत मॅच ड्रॉ राखण्यात यश मिळवलं. दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का देत श्रीलंकेनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. यामुळं भारताला मालिकेत बरोबरी करणं गरजेचं झालेलं आहे. भारताला काहीही करुन तिसऱ्या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. 7 ऑगस्ट रोजी तिसरा सामना खेळवण्यात येणार आहे.


संबंधित बातमी:


IND vs SL: टीम इंडियाचा पराभव होताच गौतम गंभीरचा चेहरा पडला; रिॲक्शन सोशल मीडियावर व्हायरल