India vs South Africa 1st ODI : भारतीय क्रिकेट संघानं (India National Cricket Team) आपल्या घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 2-1 असा पराभव केला. आता दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (6 ऑक्टोबर) लखनौच्या इकाना इंटरनॅशनल स्टेडियमवर (Ekana Cricket Stadium) होणार आहे.


हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मात्र खेळणार नसून त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी शिखर धवन (Shikhar Dhawan) संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्मा आता थेट टी-20 विश्वचषकात खेळताना दिसणार आहे, तर शिखर धवन विश्वचषकात खेळणार नाही. 


रोहितशिवाय विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत यांच्यासह इतर सिनिअर्स खेळाडूंना या वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. अनेक सिनिअर्स प्लेयर्सना विश्रांती दिल्यानंतर श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. रोहित आणि कोहलीच्या अनुपस्थितीत शिखर धवनला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.  






युवा खेळाडूंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी 


सिनिअर प्लेयर्सना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेत मोठी कामगिरी करण्याची संधी टीम इंडियातील युवा खेळाडूंना मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांचे संघात पुनरागमन झालं आहे. तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, शाहबाज अहमद, मुकेश कुमार यांना टीम इंडियामध्ये स्थान मिळालं आहे. संजू सॅमसनलाही टीम इंडियात स्थान मिळालं आहे.


या मालिकेनंतर दीपक-श्रेयस ऑस्ट्रेलियाला जाणार 


पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडिया लखनौला पोहोचली असून खेळाडूंचा कसून सराव सुरु आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर देखील या वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहेत. या दोघांना टी-20 विश्वचषकासाठी स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत ठेवण्यात आलं आहे. श्रेयसकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर दोन्ही खेळाडू विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. 


एकदिवसीय मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ :


भारतीय क्रिकेट संघ 


शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅसमन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज आणि दीपक चाहर.


दक्षिण अफ्रीकेचा संघ 


टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, जानेमन मालन, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्खिया, वेन पार्नेल, एंडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा आणि तबरेज शम्सी.


महत्त्वाच्या इतर बातम्या :