न्यूयॉर्क : भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील टी 20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2024) मॅचमध्ये पावसानं व्यत्यय आणला होता. पावसामुळं मॅच उशिरानं सुरु झाली आहे. पाकिस्ताननं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं डावाची सुरुवात केली. मात्र, एक ओव्हर झाल्यानंतर पावसानं पुन्हा सुरुवात केली.भारताचे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले आहेत. विराट कोहलीनं 4 तर रोहित शर्मानं 13 धावा केल्या. विराट कोहलीला सलामीला पाठवण्याची भारताची रणनीती यशस्वी होत नसल्याचं पाहायला मिळालं. विराट कोहली (Virat Kohli) सलग दुसऱ्या मॅचमध्ये मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. भारताच्या दिग्गज खेळाडूंनी विराट कोहलीला सलामीला पाठवण्याऐवजी यशस्वी जयस्वालला सलामीला पाठवावं, असा सल्ला दिला होता. मात्र, भारतीय संघानं रणनीती बदलली नव्हती.
भारताची रणनीती फसली
भारतानं यशस्वी जयस्वालला संघाबाहेर बसवून विराट कोहलीला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. विराट कोहलीनं आयपीएलमध्ये सलामीला दमदार कामगिरी केल्यानं टीम इंडियानं हा निर्णय घेतला. पण, भारतासाठी हा निर्णय महागात पडताना दिसत आहे. विराट कोहली आयरलँड विरुद्ध 1 रन करुन बाद झाला होता. तर, पाकिस्तान विरुद्ध चार धावा करुन विराट कोहली बाद झाला. दोन्ही मॅचमध्ये विराट कोहलीला सलामीला पाठवण्याची रणनीती चुकल्याचं स्पष्ट झालं आहे. अमेरिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय संघ रणनीती बदलणार का हे पाहावं लागेल. यशस्वी जयस्वालला पुन्हा संघात स्थान मिळतं का हे पाहावं लागेल.
रोहित शर्मा देखील लवकर बाद
पावसामुळं मॅच उशिरानं सुरु झाली. एक ओव्हर झाल्यानंतर पावसानं पुन्हा व्यत्यय आणला. त्यामुळं रोहित आणि विराटला मैदानाबाहेर जावं लागलं होतं. विराट कोहली बाद झाल्यानंतर रोहित शर्मानं आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोहित शर्मा 13 धावांवर बाद झाला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर भारतानं आणखी एक प्रयोग करत अक्षर पटेलला फलंदाजीला पाठवलं आहे.
भारताचा संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दूबे, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा,मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग
पाकिस्तान: मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (कॅप्टन), उस्मान खान, फखर जमान, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन शाह अफ्रिदी, हारिस रऊफ ,मोहम्मद आमिर, नसीम शाह,
संबंधित बातम्या :